महिलांनी कायद्याचे ज्ञान ठेवावे
By admin | Published: March 27, 2017 12:52 AM2017-03-27T00:52:01+5:302017-03-27T00:52:01+5:30
महिला व बालकांच्या कल्याणासाठी व संरक्षणासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना व कायदे तयार केल्या आहेत.
किरण अवचर यांचे प्रतिपादन : चामोर्शीत महिला सक्षमीकरणावर चर्चासत्र
चामोर्शी : महिला व बालकांच्या कल्याणासाठी व संरक्षणासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना व कायदे तयार केल्या आहेत. प्रत्येक महिलेने कायद्याचे ज्ञान ठेवावे, स्वयंसेवी संस्थांनी महिलांना कायद्याबाबत जागृत करावे, असे आवाहन चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक किरण अवचर यांनी केले.
महिला व बालकांसाठी सहायक कक्ष पोलीस स्टेशन चामोर्शी, कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय व गुरूकूल इंटरनॅशनल मल्टिडीसीप्लीनरी रिसर्च जर्नल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला ‘सक्षमीकरण काल आज आणि उद्या’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ठाणेदार किरण अवचर बोलत होते. कार्यक्रमाला दादासाहेब देवतळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर म्हशाखेत्री, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप बारसागडे, अॅड. माधुरी रोहणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दिलीप बारसागडे यांनी राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीचा हवाला देत पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची वाढलेली संख्या चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविक किरण कांबळे, संचालन प्रा. दीपिका हटवार तर आभार प्रा. वंदना थुटे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)