व्यसनमुक्तीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:27 AM2018-08-04T01:27:14+5:302018-08-04T01:27:52+5:30
महिला, युवक, शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. गावात किंवा वॉर्डात दारूबंदी, खर्राबंदी करायची असेल तर महिलांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महिला, युवक, शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. गावात किंवा वॉर्डात दारूबंदी, खर्राबंदी करायची असेल तर महिलांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.
तहसील कार्यालय व मुक्तिपथ अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पोटेगाव मार्गावरील गोंडवन कलादालनात व्यसनमुक्तीबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा मार्गदर्शन करीत होत्या. कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती दुर्लभा बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, तहसीलदार दयाराम भोयर, संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, नगरसेवक प्रमोद पिपरे, केशव निंबोड, पं.स.सदस्य जास्वंदा गेडाम, जान्हवी भोयर, सुषमा मेश्राम, मारोती इचोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला तालुक्यातील ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर आदी उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान मुक्तिपथच्या स्वयंसेवकांनी तंबाखू व दारूचे होणारे आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक परिणाम यांची माहिती दिली. त्याचबरोबर कोटपा कायद्याची अंमलबजावणी शासकीय कार्यालयात कशी करावी, याबाबतही माहिती दिली. प्रत्येक लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच कर्मचाऱ्याने स्वत:चे कार्यालय तंबाखू व दारूमुक्त करावे, असे आवाहन केले. उपस्थितांचे आभार संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे यांनी मानले.