दारूबंदीसाठी महिला धडकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:38 AM2018-09-02T00:38:57+5:302018-09-02T00:40:01+5:30
कुरखेडा तालुक्यातील महिलांनी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक कार्यालयावर ३१ आॅगस्ट रोजी धडक दिली. दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना राखी बांधून दारूविक्री बंद करून रक्षण करण्याची ओवाळणी निवेदनाद्वारे मागितली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील महिलांनी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक कार्यालयावर ३१ आॅगस्ट रोजी धडक दिली. दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना राखी बांधून दारूविक्री बंद करून रक्षण करण्याची ओवाळणी निवेदनाद्वारे मागितली.
कुरखेडा तालुक्यातील तळेगाव, वाकडी व साधूटोला येथील महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून जिल्हा पोलीस अधीक्षकांना राखी बांधली व आपल्या समस्या सांगितल्या. पोलीस अधीक्षकांनीही महिलांनी आणलेल्या वचन कार्डवर स्वाक्षरी करून त्यांना दारू बंद करण्याचे वचन ओवाळणी म्हणून दिले.
जिल्हाभरात गेल्या आठवड्यात रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलीस बांधवाना राखी बांधून ओवाळणी मागण्याचा कार्यक्रम मुक्तिपथतर्फे घेण्यात आला होता. हातात पूजेचे ताट, दिवा, राख्या, मिठाई घेऊन कुठे ४०, कुठे ५० तर कुठे ७० बहिणी पोलिसांना राखी बांधायला गेल्या. ओवाळणीमध्ये महिलांनी दारू बंद करण्याचे वचन मागितले. जिल्ह्यात २७ मार्च १९९३ पासून दारूबंदी आहे, परंतु अवैध रीतीने मिळणाऱ्या दारूमुळे आजही महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी, सिरोंचा, मुलचेरा, कुरखेडा, एटापल्ली, अहेरी, चामोर्शी, कोरची, धानोरा व भामरागड येथील पोलीस मदत केंद्रे, सर्वच तालुक्यातील पोलीस स्टेशनवर आसपासच्या गावातील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी जाऊन पोलिसांना दारू बंद करण्याची ओवाळणी मागितली.
पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन
सिरोंचा तालुक्यातील आसरअली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर दराडे यांनी १५ सप्टेंबरपर्यंत गावातील दारू बंद करेन, असे वचनच भगिनींना दिले. कुरखेडा येथील पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांनी महिलांची साथ मिळाली, तर शंभर टक्के दारू बंद करू असे आश्वासन भगिनींना दिले. तर गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी, भगिनींनी ओवाळणीच्या रुपात हक्काने पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली, असे उद्गार काढले. भामरागड तालुक्यातील कोठी या मदत केंद्रावरील पोलिसांनी लगेचच गावात रॅली काढून सुगंधित तंबाखूचे डबे जप्त केले. राजाराम येथील मदत केंद्रावरील पोलिसांनीही १० दिवसात दारू बंद करू असे वचन महिलांना दिले.