दारूविक्रीविरोधात महिलांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:21 AM2018-09-05T01:21:12+5:302018-09-05T01:21:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत सोनसरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या मोहगाव, खापरी गावातील महिलांनी कन्हारटोला येथील अवैध दारू विक्री बंद व्हावी, या मागणीला घेऊन कन्हारटोला गावात जनजागृती रॅली काढली. दारूविक्रेत्यांना नोटीस देऊन दारू विक्री बंद करण्यासाठी सांगितले. कन्हारटोलातील दारूविक्रीविरोधात दोन्ही गावातील महिला एकवटल्या.
सोनसरी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया कान्हारटोला येथे दारू विक्री सुरु आहे. आसपासच्या गावातील नागरिक तेथे येऊन दारू पीत आहेत. कन्हारटोलाची दारू बंद व्हावी यासाठी ८० ते १०० महिला एकवटल्या. त्यांनी बैठक घेतली व त्यानंतर गावातील दारू विक्रेत्यांना दारू विक्री थांबवण्यासाठी नोटीस दिली. महिलांच्या बैठकीमध्ये दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच महिलांनी गावात फेरी काढून सर्व दारूविक्रेत्यांना दारू विक्री न करण्याची तंबी दिली. गाव संघटनेतर्फे दारू विक्रेत्यांना पाच दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्या नंतर दारूविक्री केल्यास विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक, रमेश राऊत, मडावी व मुक्तिपथ कार्यकर्ते हजर होते.
अनोखी गांधीगिरी
जिल्ह्यात दारू विक्री करणाºया विक्रेत्यांमध्ये अनेक महिलाही आहेत. मोहगावातील एका दारूविक्रेतीला गावातील महिलांनी चक्क राखी बांधली आणि ‘बाई, दारू विकू नकोस’ असे आवाहन केले. महिलांनी केलेल्या या अनोख्या गांधीगिरीमुळे ती दारूविक्रेतीही अचंबित झाली. तसेच महिलांनी गावातील नागरिकांनाही राखी बांधून अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.