महिलांची दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2017 01:54 AM2017-06-17T01:54:28+5:302017-06-17T01:54:28+5:30
कुरखेडा पोलिसांनी वाकडी येथील दारूबंदी महिला समितीच्या सदस्यांच्या मदतीने मोहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकून
वाकडी येथे कारवाई : दारूबंदी समितीच्या सदस्यांनी दिली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा पोलिसांनी वाकडी येथील दारूबंदी महिला समितीच्या सदस्यांच्या मदतीने मोहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकून दारू काढणाऱ्या दोन युवकांना अटक केली आहे.
राजेश जुगल कुमरे (६५), दीपक राजेश कुमरे (२६) दोघेही रा. मोहगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. वाकडी येथे दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही वाकडी परिसरात राजेश व दीपक मोहफुलाची दारू काढून विकत होते. याबाबत वाकडी येथील दारूबंदी समितीच्या महिलांनी दारूभट्टी बंद करण्याची पूर्वसूचना दारू विक्रेत्यांना दिली होती. मात्र त्यांनी दारूभट्टी बंद केली नाही. त्यामुळे महिलांनी याबाबतची माहिती कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे यांना दिली. ठाणेदार घारे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार अरूण पारधी, नायक पोलीस शिपाई वसंत जंजाळकर, संजय मेश्राम, संघमित्रा सहारे, शकुंतला दुग्गा यांच्या पथकाने हातभट्टी धाड टाकली. यामध्ये २० लिटर मोहफुलाची दारू व दारू काढण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. दोघांच्याही विरोधात कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. कुरखेडा पोलिसांनी मागील दोन महिन्यांपासून अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गावामध्ये अवैध धंदे चालू असल्यास याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी कुरखेडा पोलिसांना द्यावी, असे आवाहन ठाणेदारांनी केले आहे.