महिला रुग्णालयाचे काम वांद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 01:02 AM2018-01-04T01:02:21+5:302018-01-04T01:02:36+5:30

शहरातील बहुप्रतीक्षित शासकीय महिला रुग्णालयाच्या भव्य इमारतीचे बांधकाम होऊन दिड वर्ष लोटले असले तरी या रुग्णालयाची सेवा अद्याप सुरू होऊ शकली नाही.

 Women's Hospital work in Vandana | महिला रुग्णालयाचे काम वांद्यात

महिला रुग्णालयाचे काम वांद्यात

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाचा हलगर्जीपणा : वाढीव कामांसाठी ५० लाखांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरातील बहुप्रतीक्षित शासकीय महिला रुग्णालयाच्या भव्य इमारतीचे बांधकाम होऊन दिड वर्ष लोटले असले तरी या रुग्णालयाची सेवा अद्याप सुरू होऊ शकली नाही. विशेष म्हणजे अजूनही काही महिने हे रुग्णालय सुरू होण्याची शक्यता नाही. त्यासाठी आरोग्य विभागाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याची बाब आता समोर येत आहे.
तब्बल १८ कोटी ७७ लाख रुपये खर्चातून उभारलेल्या या इमारतीचे दोन टप्प्यात बांधकाम झाले आहे. एकूण ७२६३ वर्ग मीटरवर असलेल्या या तीन मजली बांधकामात वैद्यकीयदृष्ट्या अनेक त्रुटी बाकी होत्या. तरीही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांनी ती इमारत २६ मे २०१६ रोजी स्वत:कडे हस्तांतरित करून घेतली. वास्तविक त्या इमारतीमध्ये योग्य पद्धतीने आॅपरेशन थिएटरचे बांधकाम, अनावश्यक खिडक्या, प्रसुतीगृहालगत स्वच्छतागृह, योग्य ठिकाणी पार्टिशन, पार्किंगस्थळी दरवाजे अशा काही त्रुटी असल्याचे अलिकडे केलेल्या पाहणीत निदर्शनास आले. आता या त्रुटी दूर करण्यासाठी ५० लाख १२ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. हा निधी मिळण्यासाठी बांधकाम विभागाने एनआरएचएम आणि जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविले आहे. त्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही.
हे रुग्णालय तत्कालीन पालकमंत्री आर.आर. पाटील यांच्या कार्यकाळात मंजूर झालेले असले तरी त्याचे बांधकाम गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले आहे. ते स्वत: डॉक्टर असताना या बांधकामातील त्रुटी त्यांच्याही लक्षात आल्या नसल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. अजून काही महिने रुग्णालय सुरू होण्याची शक्यता नाही.
त्रुटी असताना इमारत ताब्यात घेतली कशी?
इतर व्यावसायिक किंवा शासकीय कार्यालयांच्या इमारती आणि रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम यामध्ये बरीच तफावत असते. सुसज्ज रुग्णालयाची इमारत उभारताना ती तांत्रिकदृष्ट्या सर्व सुविधायुक्त होत आहे किंवा नाही याची तपासणी संबंधित आरोग्य प्रशासनाने वेळोवेळी करणे आणि राहिलेल्या त्रुटी वेळीच निदर्शनास आणून देणे गरजेचे असते. मात्र महिला रुग्णालयाच्या बाबतीत तसे झाले नाही. एवढेच नाही तर इमारत हस्तांतरित करून घेतानाही या त्रुटींची तपासणी करण्यात आली नाही. परिणामी आता दिड वर्षानंतर रुग्णालय सुरू करण्यासाठी कर्मचाºयांची नियुक्ती झाल्यानंतर या त्रुटी दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने आरोग्य प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title:  Women's Hospital work in Vandana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.