महिलाशक्तीला कमी लेखून चालणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:04 AM2018-10-05T00:04:06+5:302018-10-05T00:05:26+5:30
महिला आता सुशिक्षित झाल्या असून निर्णय घेण्यास सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे महिलांना कमी लेखू नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : महिला आता सुशिक्षित झाल्या असून निर्णय घेण्यास सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे महिलांना कमी लेखू नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.
आलापल्ली येथील राणी दुर्गावती विद्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत होत्या. मेळाव्याला माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम, अहेरी विधानसभा प्रमुख राजेंद्र वैद्य, माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान जि.प.बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, बेबी उईके, जि.प.सदस्य ऋषी पोरतेट, जि.प.सदस्य ग्यानकुमारी कौशी, एटापल्लीच्या सभापती बेबी लेकामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला कार्यकर्ते शाहीन हकीम, पं.स.सदस्य प्रांजली शेंबळकर, माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, आलापल्लीचे माजी सरपंच रेणुका कुळमेथे, ग्रा.पं.सदस्य कैलास कोरेत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना चित्रा वाघ म्हणाल्या, स्वयंपाक घरातील किराणा, गॅस सिलिंडर व जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुप्पट झाले आहे. त्यामुळे जगने कठीण झाले आहे. नोटबंदी पूर्णपणे फसली आहे. महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विद्यमान शासनाला धडा शिकविण्याची वेळ आता आली आहे. महिलांबाबत बेताल व्यक्तव्य करण्याची हिंमत सरकारमधील मंत्री करीत आहेत. त्यांना त्यांची जागा दाखविणे आवश्यक आहे.
नारीशक्तीमध्ये फारमोठी ताकद आहे, ही ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. महिलांनी स्वत:च्या अधिकार व हक्काबाबत जागरूक असले पाहिजे. स्वत:च्या संसाराचा गाडा हाकतानाच बाहेरच्याही जगाकडे लक्ष घालले पाहिजे. महिलांनी राजकारणात पुढे यावे, महिलांमध्ये फार मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन चित्रा वाघ यांनी केले.
कार्यक्रमाला अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेकडो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या शाहिन हकीम यांची जिल्हा महिला कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली.