पुलाच्या अॅप्रोच मार्गाचे काम रखडले
By admin | Published: June 12, 2017 12:58 AM2017-06-12T00:58:47+5:302017-06-12T00:58:47+5:30
जोगीसाखरा ते वैरागड मार्गावरील नाल्यावर मागील वर्षी जुने पूल तोडून नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले.
जोगीसाखरा-वैरागड दरम्यानचा पूल : पावसात रहदारी ठप्प पडण्याचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : जोगीसाखरा ते वैरागड मार्गावरील नाल्यावर मागील वर्षी जुने पूल तोडून नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र दोन्ही बाजुच्या अॅप्रोच रस्त्याचे काम अपूर्ण आहे. या मार्गाचे खडीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
शासनाने २०१५-१६ मध्ये वैरागड, जोगीसाखरा मार्गावरील नाल्यावरील जुने पूल तोडले. त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करण्यास सुरूवात केली. या बाबीला दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला. मात्र अजूनपर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. पूल उंच असल्याने अॅप्रोच रस्ते नव्याने तयार करण्यात आले आहेत. दोन्ही अॅप्रोच रस्त्यावर माती व गिट्टी टाकण्यात आली आहे. मात्र दोन्ही बाजुला मार्गाचे खडीकरण झाले नाही. बाजुला पिचिंग करण्याचे काम अपूर्ण आहे. रहदारीपुरता माती टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे. पावसाळ्यात मातीचे चिखल निर्माण होऊन जड वाहने या ठिकाणी फसण्याचा धोका निर्माण झाला आहे. सातत्याने वाहने ये-जा करीत असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी मार्गाचे खडीकरण न झाल्यास रहदारी ठप्प पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मार्ग धानोरा-मालेवाडा-वैरागड-जोगीसाखरा-शंकरपूर मार्गे गोंदियाकडे जातो. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. रहदारी बंद पडल्यास दर दिवशी ये-जा करणाऱ्यांची फार मोठी पंचाईत होणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून पुलाच्या अॅप्रोच रस्त्याचे खडीकरण करण्याचे निर्देश कंत्राटदाराला द्यावे, अशी मागणी जोगीसाखरा परिसरातील नागरिकांनी केली आहे.