कुकडीजवळील पुलाचे काम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:45 PM2017-11-16T23:45:38+5:302017-11-16T23:46:12+5:30
वैरागड-रांगी-धानोरा मार्गावरील कुकडी-विहिरगाव जवळील जुन्या नाल्याच्या पुलावर मागील वर्षी नवीन पूल बांधण्यात आले. या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वैरागड-रांगी-धानोरा मार्गावरील कुकडी-विहिरगाव जवळील जुन्या नाल्याच्या पुलावर मागील वर्षी नवीन पूल बांधण्यात आले. या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र पुलाचे काम अपूर्ण आहे. उर्वरित काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूला मुरूम टाकून उंच रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी दगडांचे पिचिंग केली नसल्याने पावसाळ्यात दोन्ही बाजूने सदर रस्ता खचला आहे. रस्त्याच्या खचलेल्या भागात तारेचे कुंपण तयार करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या निर्मितीवर लाखो रूपयांचा खर्च केला आहे. तरीही यापुलाचे काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात काम करता येत नसल्याने सदर काम अपूर्ण ठेवण्यात आले असावे, असा अंदाज नागरिकांकडून वर्तविला जात होता. मात्र आता पावसाळा संपूनही दगडांची पिचिंग करण्याचे व कठडे बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. काम अपूर्ण असतानाच संपूर्ण बिल काढले असावे, त्यामुळे कंत्राटदार अपूर्ण काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. बाजूला कठडे नसल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दगडांची पिचिंग नसल्याने दरवर्षी पावसाच्या पाण्याने माती व मुरूम वाहून जाऊन रस्ताही वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.