निधीअभावी रखडले धडक सिंचन विहिरींचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:39 AM2021-09-25T04:39:46+5:302021-09-25T04:39:46+5:30
धडक सिंचन विहिरींची कामे करणारे गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १ हजार ७०० लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत आहेत. कुरखेडा तालुक्यातील १५१, आरमोरी ...
धडक सिंचन विहिरींची कामे करणारे गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १ हजार ७०० लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत आहेत. कुरखेडा तालुक्यातील १५१, आरमोरी १९७, गडचिरोली १९५, धानोरा १२१, कोरची ८०, चामोर्शी ३०६, मुलचेरा ५८, अहेरी १२९, एटापल्ली ९४, भामरागड ४८, सिरोंचा तालुक्यातील १९२ असे जिल्ह्यातील एकूण १ हजार ७०० लाभार्थ्यांना अद्याप पूर्ण अनुदान मिळाले नाही. अनुदानाअभावी शेतकऱ्यांच्या विहिरी अपूर्ण असल्याने सिंचनाची साधने उपलब्ध हाेण्यास दिरंगाई हाेत आहे.
बाॅक्स
१५१ पैकी केवळ ३८ विहिरी पूर्ण
कुरखेडा तालुक्यातील वडेगाव, चिचेवाडा, तळेगाव, भटेगाव, खेडेगाव, धमदीटोला, देऊळगाव, गोठणगाव, पलसगड, जांभुळखेडा, वासी, अरततोंडी, गेवर्धा, धानोरी, येंगलखेडा, सिंदेसूर, मरारटोला, खरमतटोला, वासी, कढोली, मौशी, लेंढारी, शिरपूर, मालदुगी, भटेगाव, चारभट्टी, कुंभीटोला, नान्ही, जांभळी, बांधगाव, शिवणी, पुराडा, सावलखेडा, सोनेरांगी, आंबेझरी, खैरी, सायगाव, येरकडी, उराडी, कराडी, वाघेडा, घाटी, मोहगाव, वाकडी, कराडी, चांदागड आदी गावांसह तालुक्यातील १५१ लाभार्थ्यांना विहिरी मंजूर करण्यात आल्या. यापैकी केवळ ३८ विहिरींचे काम पूर्ण झाले असून जवळपास ११३ विहिरींचे कामे सुरू होऊन अर्धवट आहेत.
बाॅक्स
तीव्र आंदाेलन करणार
कुरखेडा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात या योजनेंतर्गत काही लाभार्थ्यांचे अर्धे अनुदान दिले आहे. बहुतांश शेतकऱ्यांना एक रुपयाचेही अनुदान न मिळाल्याने त्यांनी विहिरींचे बांधकाम सुरू केले नाही. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचन विहिरींचे रखडलेले अनुदान लवकर द्यावे, अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी दिला आहे.
230921\2939img-20210923-wa0074.jpg
धडक सिंचन विहीरीची लाभार्थी महीला अनूदानाचा प्रतिक्षेत