थेट जनतेपर्यंत पोहोचून कामे करा
By admin | Published: October 18, 2015 01:34 AM2015-10-18T01:34:35+5:302015-10-18T01:34:35+5:30
जनतेने आपल्यापर्यंत येण्याची वाट न बघता आपण क्षेत्रीयस्तरावर जनतेपर्यंत पोहोचून लोकांची कामे केली तर आपले काम लोकाभिमूख ठरते,
पालक सचिवांचे निर्देश : बैठकीत विविध विकास कामांचा घेतला आढावा
गडचिरोली : जनतेने आपल्यापर्यंत येण्याची वाट न बघता आपण क्षेत्रीयस्तरावर जनतेपर्यंत पोहोचून लोकांची कामे केली तर आपले काम लोकाभिमूख ठरते, त्यामुळे सर्वांनी आपल्या सेवांचा विस्तार येणाऱ्या काळात करावा, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा राज्याच्या वन व महसूल विभागाचे सचिव विकास खारगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, मुख्य वनसंरक्षक के. कल्याणकुमार, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड आदी उपस्थित होते. जनतेची सेवा करण्यासाठी आपण आहोत, हे भूमिका आपण लक्षात ठेवून आपल्या कार्यकक्षाचा विस्तार करावा, असे सांगून पालक सचिव खारगे म्हणाले की, सेवा हक्क अधिनियम लागू झाला आहे. या अनुषंगाने वेळेत सेवा देणे आता बंधनकारक झालेले आहे. या अधिनियमात अनुसूची जाहीर केलेल्या सेवा आणि त्यांचा कालावधी याबाबत अधिकाऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षित करण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीत खारगे यांनी जलयुक्त शिवार योजना, नरेगा तसेच जिल्ह्यात असणारी मलेरियाबाबतची गंभीर स्थिती आदींचा सविस्तर आढावा घेतला. जलयुक्त शिवार अंतर्गत कामे चांगल्या स्वरूपाची झालेली आहेत. या कामांचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी या कामासोबत इतर विभागांशी समन्वय साधून वैयक्तिक लाभाच्या योजनांची सांगड घालून पॅकेज पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. पालक सचिव खारगे यांनी सकाळी जलयुक्त शिवार अंतर्गत वन आणि कृषी खात्यांमार्फत झालेल्या पोर्ला येथील दोन व कळमटोला येथील एका शेततळ्याची पाहणी केली. या भेटीदरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न विचारात घेऊन प्रत्येक कार्यालयाच्या वतीने गावपातळीवर जाऊन माहिती देणे, बैठका, प्रचार प्रसिद्धी आदींमधून शासकीय कामे लोकांपर्यंत नेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात मलेरियाची स्थिती खूप गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर मलेरियाबाधीत क्षेत्रात गावपातळीवर सभा घेण्याच्या सूचना खारगे यांनी दिल्या. या भागात कोरडा दिवस कटाक्षाने पाळणे आणि गप्पी मासे तसेच मच्छरदाणीचा वापर याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले. तसेच पॉवर पार्इंट सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विकास कामांची माहिती त्यांनी सादर केली. संचालन जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे यांनी केले. बैठकीला वन, आरोग्य, महसूल व इतर विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)