दिव्यांगांसाठी सामाजिक बांधीलकीतून काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 05:00 AM2022-06-08T05:00:00+5:302022-06-08T05:00:33+5:30

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिव्यांगांना त्यांच्या सुप्त कलागुणांना, कौशल्यांना भविष्यात वृद्धिंगत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तालुकास्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांना दिव्यांगांसोबत कसे काम करावे, तसेच त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याबाबतच्या प्रक्रियेसाठी प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले. 

Work for the disabled through social commitment | दिव्यांगांसाठी सामाजिक बांधीलकीतून काम करावे

दिव्यांगांसाठी सामाजिक बांधीलकीतून काम करावे

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासोबत जन्मत:च आलेली विविध आव्हाने आपण सर्व जवळून पाहात आलोय. दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनीच सामाजिक बांधीलकीतून काम करावे, असे  आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गडचिरोली येथे केले. 
जिल्हा प्रशासन आणि विविध अशासकीय संस्थांनी मिळून गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांना नि:शुल्क दिव्यांग साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम मंगळवारी (दि.७) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित केला होता, त्या कार्यक्रमात खा.सुळे बोलत होत्या. या कार्यक्रमाला महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रवींद्र वासेकर, सुरेखा ठाकरे, समाजकल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम व इतर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिव्यांगांना त्यांच्या सुप्त कलागुणांना, कौशल्यांना भविष्यात वृद्धिंगत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तालुकास्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांना दिव्यांगांसोबत कसे काम करावे, तसेच त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याबाबतच्या प्रक्रियेसाठी प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले. 
कार्यक्रमाचे संचालन मित्रा संस्थेचे दिनेश मासोदकर यांनी तर प्रास्ताविक अभिजित राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी संजय पुसाम, पंकज खानझोडे, प्रवीण राठोड, निलेश झटाळे, राकेश तिहाडे, सुंदकुमार, नीलिमा हारगुडे, अबोली उबाळे, टिना शेंडे यांनी सहकार्य केले.

१९१ बालकांना मिळाले अत्याधुनिक कर्णयंत्र 

मित्रा संस्था नागपूर व गडचिरोली प्रशासनाच्या मदतीने जिल्ह्यातील २१४ कर्णबधिर व्यक्तींची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १९१ पात्र बालकांची अत्याधुनिक डिजिटल कर्णयंत्र नि:शुल्क देण्याकरिता निवड करण्यात आली. त्याचे वाटप मंगळवारी करण्यात आले. 

अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच ॲण्ड हियरिंग मुंबई, जिल्हा प्रशासन आणि मित्रा संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. 
मुंबईच्या संस्थेने पहिल्या टप्प्यात अंदाजे १० लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक कर्णयंत्र ८० जणांना दिले. 
राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील काही निवडक लाभार्थ्यांना युडीआयडी प्रमाणपत्रही देण्यात आले.

जिल्ह्याच्या मागासलेपणाची  ओळख पुसायला हवी
-    गडचिरोली जिल्ह्याची ओळख मागास जिल्हा म्हणून, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून करून दिली जाते. पण आता मोठ्या प्रमाणात विकास कामे पूर्ण झाली आहेत, काही सुरु आहेत. नक्षलवाद आणि मागासलेपण असलेला जिल्हा या चौकटीतून आता आपण बाहेर पडायला हवे, असे खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. 
-    या जिल्ह्यामध्ये पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. या निसर्गसंपन्न जिल्ह्यात मी वर्षातून एकदातरी येणारच आहे. इतरांनाही भेटी देण्याच्या सूचना करणार असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध पुनर्वसनात्मक उपक्रमांसाठी समन्वय साधून काम करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title: Work for the disabled through social commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.