गडचिरोली बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:24 AM2019-07-11T00:24:25+5:302019-07-11T00:24:44+5:30
गडचिरोली येथील बसस्थानकाचा विस्तार करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून बसस्थानकाचा विस्तार, बसस्थानक परिसरात डांबरीकरण व इतर कामे करायची आहेत. मात्र या सर्व बाबींचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली येथील बसस्थानकाचा विस्तार करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून बसस्थानकाचा विस्तार, बसस्थानक परिसरात डांबरीकरण व इतर कामे करायची आहेत. मात्र या सर्व बाबींचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. दीड वर्षांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत बरेच काम शिल्लक आहे.
गडचिरोली हे जिल्हास्तरावरील बसस्थानक आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यातील बसेस गडचिरोली येथे येतात. तसेच गडचिरोली येथून ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. त्यामुळे सदर बसस्थानकावर अधिकचे फलाट असणे आवश्यक होते. केवळ चार फलाट असल्याने बऱ्याचशा बसेस बसस्थानक परिसरात अशाच उभ्या केल्या जात होत्या. त्यामुळे बसच्या समोर जाऊन प्रवाशांना नेमकी बस कुठे चालली हे बघावे लागत होते. परिणामी प्रवाशांना बसस्थानकाच्या बाहेरच ताटकळत बसावे लागत होते.
फलाटांची संख्या वाढवून प्रवाशांना आवश्यक त्या सोयीसुविधा देण्यासाठी बसस्थानकाचे नूतनीकरण व विस्ताराचे काम मागील दीड वर्षांपासून हाती घेतले आहे. मात्र दीड वर्षांचा कालावधी होऊनही केवळ इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीची फिनिशिंग व इतर कामे बाकी आहेत.
विस्तारित झालेल्या इमारतीत प्रवाशांना बसण्यासाठी केवळ बाक बनविण्यात आले आहेत. बसस्थानकाच्या बांधकामासाठी अर्ध्या जागेवर टिन लावून जागा ताब्यात घेतली आहे. त्यामुळे सध्या वापरासाठी केवळ अर्धीच जागा शिल्लक आहे. अर्ध्या बसेस बसस्थानकाच्या समोर तर अर्ध्या बसेस बसस्थानकाच्या मागील बाजूस उभ्या केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय होत आहे. बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमधील पाणी तुडवित समोर जावे लागते. मागील दीड वर्षांपासून प्रवाशी कमालीचे त्रस्त आहेत.
कामाची गती वाढविण्याबाबत कंत्राटदाराला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
रेतीचे सांगितले जाते कारण
मागील चार महिने रेती मिळाली नाही. त्यामुळे बांधकामाची गती मंदावली, असे कारण कंत्राटदार सांगत आहे. मात्र चार महिन्यांपूर्वी रेती मिळत होती. आताही मूबलक प्रमाणात रेती उपलब्ध आहे. त्यामुळे रेती न मिळण्याचे सांगितले जाणारे कारण पुरेसे नाही. अर्धीअधिक जागा बांधकामासाठी कंत्राटदाराने ताब्यात घेतली असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. याच गतीने काम सुरू राहिल्यास काम पूर्ण होण्यासाठी पुन्हा दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.