हाताला काम द्या, अन्यथा खाणीचे काम सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:06 AM2019-02-02T01:06:17+5:302019-02-02T01:07:09+5:30
महिनाभरापूर्वी एटापल्लीजवळील गुरूपल्लीजवळ झालेल्या ट्रक-बस अपघातात ४ लोकांचा बळी गेल्यानंतर या मार्गावरील लोहखनिजांची वाहतूक बंद करून लोह प्रकल्पाचे कामही बंद करण्यात आले. यामुळे आमचा रोजगार बंद होऊन पोटावर पाय पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महिनाभरापूर्वी एटापल्लीजवळील गुरूपल्लीजवळ झालेल्या ट्रक-बस अपघातात ४ लोकांचा बळी गेल्यानंतर या मार्गावरील लोहखनिजांची वाहतूक बंद करून लोह प्रकल्पाचे कामही बंद करण्यात आले. यामुळे आमचा रोजगार बंद होऊन पोटावर पाय पडला आहे. एकतर आमच्या हाताला दुसरे काम द्या, नाहीतर खाणीचे काम पुन्हा सुरू करा, अशी मागणी एटापल्ली व परिसरातील गावांमधील दिडेशेवर नागरिकांनी शुक्रवारी (दि.१) जिल्हाधिकाºयांकडे एका निवेदनातून केली.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरजागड पहाडावरील लोहखनिजाच्या कामावर जाणाऱ्या या ८०० वर मजुरांचा रोजगार खाणीचे काम बंद झाल्याने हिरावल्या गेला. गुरूपल्लीजवळील अपघातानंतर लोहखानीचे काम बंद करण्यासाठी एटापल्लीतील आंदोलन झाले. परंतू हे आंदोलन करणारे आम्ही नसून संधीसाधू लोक होते. त्यांना आमच्या रोजगाराशी काही घेणे-देणे नाही. काम बंद झाल्याने आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. तो आधी दूर करा, असे साकडे या लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला.यावेळी एटापल्लीतील प्रसाद नामेवार, सचिन गड्डमवार, मधुकर तलांडे, यादव आत्राम, जीवन मंडल, रुपाली गुरनुले बांडे येथील दयालू खुजूर, पुसू दुर्वा, पंदेवाही येथील राजू नागापुरे, परपनगुडा येथील सुरेश महू नरोटी, जंबिया येथील सत्यदीप हलदार यांच्यासह अनेक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- तर ५ पासून उपोषण
आमच्या भागात रोजगाराचे दुसरे कोणतेही साधन नाही. या कामातून मिळणाऱ्या रोजीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे हे काम त्वरित सुरू न केल्यास ५ फेब्रुवारीपासून उपोषणाला बसण्याचा इशारा नंदा नागभिडकर, निता गुरनुले व इतर महिला आणि युवकांनी यावेळी दिला.