कोनसरीत गावकऱ्यांच्या पुढाकाराने लोह प्रकल्पाच्या कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 05:00 AM2021-11-20T05:00:00+5:302021-11-20T05:00:38+5:30

आज ४-५ देशात माझ्या कंपन्यांची कामे चालतात. तुम्ही मला साथ दिल्यास मी तुमच्या परिसराचे रूप बदलवून दाखवीन. मला कोणत्याही एका व्यक्तीचा विकास करायचा नसून सामूहिक विकासाला मी महत्त्व देतो. या प्रकल्पात स्थानिक लोकांनाच घेणार आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षणही सुरू करणार आहे. तुम्ही साथ देण्यासाठी तयार असाल तर मी तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईन. या भागात शिक्षणाच्या अद्यावत सोयीही उभ्या करणार, पण शिकून बाहेर जाऊ नका.

The work of the iron project started with the initiative of the villagers in Konsari | कोनसरीत गावकऱ्यांच्या पुढाकाराने लोह प्रकल्पाच्या कामास सुरुवात

कोनसरीत गावकऱ्यांच्या पुढाकाराने लोह प्रकल्पाच्या कामास सुरुवात

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या कोनसरी येथील लोह प्रकल्पाच्या उभारणीचे काम अखेर शुक्रवारी (दि.१९) विधीवत सुरू करण्यात आले. त्रिवेणी अर्थमुव्हर्स आणि लॉयड्स मेटल्सच्या संयुक्त विद्यमाने उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पस्थळी त्रिवेणी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन आणि लॉयड्स कंपनीचे संचालक अतुल खाडीलकर यांच्या हस्ते पूजाअर्चा करून या कामाला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे कोणीही राजकीय पुढाऱ्यांशिवाय केवळ कोनसरीतील गावकऱ्यांच्या सहभागाने आणि त्यांच्याच पुढाकाराने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. 
या कार्यक्रमाला कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, उपसरपंच रतनराम अक्केवार, पोलीस पाटील यशवंत मानापुरे, भूमिधारी शेतकरी समितीचे अध्यक्ष बंडू बारसागडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय कुमरे, माजी सरपंच चंद्रकांत बाेनगिरवार आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांसमोर बोलताना त्रिवेणीचे एमडी बी. प्रभाकरन म्हणाले, मला कमी बोलून जास्त काम करायचे आहे. एक शेतकरी म्हणून मी व्यवसायाला सुरुवात केली. आज ४-५ देशात माझ्या कंपन्यांची कामे चालतात. तुम्ही मला साथ दिल्यास मी तुमच्या परिसराचे रूप बदलवून दाखवीन. मला कोणत्याही एका व्यक्तीचा विकास करायचा नसून सामूहिक विकासाला मी महत्त्व देतो. या प्रकल्पात स्थानिक लोकांनाच घेणार आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षणही सुरू करणार आहे. तुम्ही साथ देण्यासाठी तयार असाल तर मी तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईन. या भागात शिक्षणाच्या अद्यावत सोयीही उभ्या करणार, पण शिकून बाहेर जाऊ नका. येथेच काम करा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी, महिला, शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.

३६ शेतकऱ्यांना तत्काळ नियुक्तीपत्र
-    या प्रकल्पासाठी ज्यांनी पहिल्या टप्प्यात आपली शेतजमीन दिली त्या ३६ शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील एका सदस्याला यावेळी त्यांनी नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. या लोह प्रकल्पासाठी आधी ३६ शेतकऱ्यांची १२७ एकर जागा घेतली होती. आता आणखी ५० शेतकऱ्यांची २२५ एकर जागा विकत घेण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आम्ही खुल्या चर्चेसाठी तयार
-   सुरजागड लोहखाणीबाबत कोणाला काही समज-गैरसमज असतील तर त्यांनी आमच्याशी चर्चा करावी. आमच्या सर्व कामात पारदर्शकता आहे. त्यामुळे आम्ही याबाबत खुल्या चर्चेसाठी तयार आहे, अशी भूमिका त्रिवेणी अर्थमुव्हर्सच्या व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केली. 

पेपर मिल पुनर्जीवित करा
हा कार्यक्रम सुरू असताना आमदार डॉ. देवराव होळी येऊन प्रेक्षकांमध्ये बसले. संचालनकर्त्याचे लक्ष जाताच त्यांनी डॉ. होळी यांना मंचावर पाचारण केले. यावेळी ते म्हणाले, मला बोलावले नसले तरी या भागाचा आमदार म्हणून कंपनीचे आभार व्यक्त करण्यासाठी मी आलो आहे, असे म्हणून त्यांनी बी. प्रभाकरन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, चार वर्षांपासून हे काम ठप्प असल्याने कोनसरीत लोहप्रकल्प होणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. अखेर हे काम सुरू झाल्याचा आनंद आहे. आष्टी पेपर मिललाही पुनर्जीवित करून रोजगाराचे द्वार खुले करावे, अशी अपेक्षा त्यांनी प्रभाकरन यांच्याकडून व्यक्त केली.

 

Web Title: The work of the iron project started with the initiative of the villagers in Konsari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.