जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची कामे थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:01 AM2018-03-08T01:01:07+5:302018-03-08T01:01:07+5:30
चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसच बाकी असताना या वर्षात प्रशासकीय मंजुरीसाठी अडलेली जलयुक्त शिवार अभियानातील कामे अधांतरी आहेत.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसच बाकी असताना या वर्षात प्रशासकीय मंजुरीसाठी अडलेली जलयुक्त शिवार अभियानातील कामे अधांतरी आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रस्तावित कामे पूर्ण होणे तर दूर, जेमतेम ३० टक्केच कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हे अभियान यावर्षी जिल्ह्यात थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येत आहे.
या आर्थिक वर्षातील कामे संपवून नवीन आर्थिक वर्षाचे नियोजन करण्याचे वेध सर्व विभागांना लागले आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियानाचे नियोजन आणि समन्वय ठेवणाºया कृषी विभागाचे काम यावर्षी चांगलेच ढेपाळले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रस्तावित केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील ३५६७ कामांपैकी फेब्रुवारीपर्यंत केवळ १०८५ कामांनाच प्रशासकीय मंजुरी मिळाली.
सिंचन प्रकल्पांची कमतरता असल्यामुळे या जिल्ह्यात शेतीला सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे सिंचन सुविधा वाढविण्यासाठी राज्य शासनाने २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पहिल्या वर्षी या अभियानात जिल्ह्यातील १५२ गावांची निवड केली होती. दुसºया वर्षी १६९ गावांचा समावेश करण्यात आला. वर्ष २०१७-१८ मध्ये १११ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या गावांमध्ये जलसंधारणाची ३५६७ कामे प्रस्तावित करण्यात आली. मात्र आर्थिक वर्ष संपत असताना केवळ १०८५ कामांनाच मंजुरी मिळाल्याने प्रशासनाकडूनच या अभियानाला खिळ लावली जात असल्याचे दिसते.
ज्या १११ गावांमध्ये वेगवेगळ्या विभागांकडून जलसंधारणाची कामे नियोजित केली होती त्यात कृषि विभागामार्फत सर्वाधिक १९४६, मनरेगा मधून २०९, वनविभागामार्फत १२९६, जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत ४०, पाटबंधारे विभागामार्फत ४५ आणि चंद्रपूर पाटबंधारे विभागामार्फत २ कामे प्रस्तावित केली होती.
सर्व विभागांनी त्यांच्या लक्ष्यानुसार कामांचे नियोजन केले होते. पण मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव गेल्यानंतर त्यातील त्रृटी दूर करून सुधारित प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आले. एवढेच नाही तर ही कामे नरेगा (म.गां.राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजना) मार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले. नरेगामार्फत कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कामांना मंजुरी दिली जाते. पण फेब्रुवारीपर्यंत ती मंजुरी अनेक कामांना मिळालीच नाही.
पुढील वर्षीसाठी १०४ गावांची निवड
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीची अनेक कामे शिल्लक असली तरी पुढील वर्षीच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात २०१८-१९ मध्ये १०४ गावांची निवड करण्यात आली आहे. मात्र ती गावे कोणती आणि तिथे कोणकोणती कामे केली जाणार याचे याचे नियोजन अद्याप झालेले नाही. ते नियोजन झाल्यानंतरच एकूण कामांची संख्या आणि त्यावर खर्च केल्या जाणाºया निधीची माहिती स्पष्ट होणार आहे.