कोरेगाव नजीकच्या पुलाचे काम अपूर्ण
By Admin | Published: July 4, 2016 12:59 AM2016-07-04T00:59:05+5:302016-07-04T00:59:05+5:30
रांगी-आरमोरी मार्गावर रांगीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या कोरेगाव नजीकच्या पुलाचे काम अद्यापही अपूर्ण आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष : चिखलातून काढावी लागत आहेत वाहने
रांगी : रांगी-आरमोरी मार्गावर रांगीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या कोरेगाव नजीकच्या पुलाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. परिणामी या पुलाच्या बाजुने काढलेल्या चिखलमय कच्च्या रस्त्यावरून वाहनधारकांना वाहने न्यावी लागत आहे. मात्र या पूल बांधकामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खासगी कंत्राटदारांमार्फत रांगी-आरमोरी मार्गावर कोरेगावनजीक पुलाचे काम हाती घेण्यात आले. मात्र पावसाळ्याला सुरूवात होऊनही सदर काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे.
कोरेगावजवळील नाल्यावर पूर्वी कमी उंचीचा पूल होता. पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेऊन शासन व प्रशासनाने नवीन पुलाचे काम मंजूर केले. काही महिन्यांपूर्वी या पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली. मात्र कामात गती नसल्याने सदर काम अपूर्ण स्थितीत आहे. वाहतुकीसाठी या पुलाच्या बाजुने कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र गेल्या पाच-सात दिवसांपासून रांगी भागात दमदार पाऊस होत असल्याने या कच्च्या रस्त्यावर पाणी साचले आहे.
परिणामी चिखलमय रस्त्यातून वाहनधारकांना आपली वाहने काढावी लागत आहे. पावसात या कच्च्या रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने सदर पुलाचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी रांगी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)