कामबंद आंदोलनाने न.प.चे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 01:21 AM2019-01-02T01:21:44+5:302019-01-02T01:24:00+5:30
आपल्या विविध मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचाºयांनी १ जानेवारीपासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. स्थायी, कंत्राटी व नगर परिषद संवर्गाचे सर्वच कर्मचारी संपावर गेल्याने नगर परिषदेचे कामकाज ठप्प पडले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आपल्या विविध मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी १ जानेवारीपासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. स्थायी, कंत्राटी व नगर परिषद संवर्गाचे सर्वच कर्मचारी संपावर गेल्याने नगर परिषदेचे कामकाज ठप्प पडले होते.
रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करावे, १९९३ पासून स्थायी झालेल्या कामगारांना पागेलाड समितीचे नियम लागू करावे, नगर परिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यात यावा, नगर परिषद व नगर पंचायतीमधील रिक्तपदे भरावी, वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांची पदे भरावी, शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येनुसार सफाई कामगारांची नवीन पदे निर्माण करावी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेसाठी २५ वर्षांची अट रद्द करावी आदी मागण्यांना घेऊन १५ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शासनासोबत चर्चा केली. मात्र काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे १ जानेवारीपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा नगर परिषद कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन महातो यांनी केले. आंदोलनात एस.पी.भरडकर, गणेश ठाकरे, गणेश नाईक, एस.पठाण, राकेश शिलेदार, सारिका तांबे, अंजू शिलेदार, सुरेश मुनघाटे, ऋषी भोयर, ललीत काळे, दिनेश वाणी, भीमराव जनबंधू, सुभाष महानंदे, प्रितम राणे, टिनेश महानंदे यांनी केले. सदर आंदोलन राज्यभरातील नगर परिषद व नगर पंचायतींमध्ये सुरू आहे.
नागरिकांना नाहक मनस्ताप
या आंदोलनात नगर परिषदेअंतर्गत येणारे ५० पेक्षा अधिक सफाई कामगार व जवळपास ५० स्थायी, कंत्राटी व नगर परिषद संवर्गाचे कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे शहराची स्वच्छता, कार्यालयीन कामकाज ठप्प पडले होते. अनेक नागरिकांना संपाबाबत माहिती नसल्याने कार्यालयीन कामासाठी नगर परिषदेत येत होते. मात्र रिकामे टेबल व खुर्च्या बघून परत जात होते. दिवसभर कामकाज ठप्प पडल्याने नागरिकांना त्रास झाला. संप पुन्हा काही दिवस चालण्याची शक्यता वर्तविली जात आहे.