संयमाचा बांध तुटला; ४५ गावांतील नागरिकांचा मुरुमगावच्या महावितरण कार्यालयावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2022 02:38 PM2022-09-02T14:38:52+5:302022-09-02T14:43:20+5:30

मंजूर असलेल्या उपकेंद्राचे काम थांबविले, गावकरी म्हणतात आम्ही काय गुन्हा केला?

Work of sanctioned sub-centre stopped, citizens of 45 villages in kotagul area protested at Murumgaon Mahavitaran Office | संयमाचा बांध तुटला; ४५ गावांतील नागरिकांचा मुरुमगावच्या महावितरण कार्यालयावर ठिय्या

संयमाचा बांध तुटला; ४५ गावांतील नागरिकांचा मुरुमगावच्या महावितरण कार्यालयावर ठिय्या

googlenewsNext

कोरची/मुरुमगाव (गडचिरोली) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही कोरची तालुक्यातील कोटगूल क्षेत्रातील ४५ गावांमधील समस्या सोडविण्यात राज्यकर्त्यांना यश आले नाही. सध्या वीज पुरवठ्याची समस्या या भागात ऐरणीवर आहे. अनेक वेळा या समस्येकडे लक्ष वेधूनही चालढकलपणा केला जात असल्याने अखेर या भागातील ४५ गावांमधील नागरिकांच्या संयमाचा बांध तुटला. ३०० वर लोकांनी गुरुवारी मुरुमगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रावर ठिय्या देऊन कोटगूल क्षेत्रासाठी मंजूर असलेल्या उपकेंद्राचे काम सुरू का करत नाही?, असा सवाल केला. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने रात्री उशिरापर्यंत नागरिक त्याच ठिकाणी ठाण मांडून होते.

गेल्या २५ ऑगस्टला नागरिक व स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोरची तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन देऊन विजेची समस्या सोडवण्याची विनंती केली होती. त्या निवेदनात दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे गुरुवारी दुपारी मुरुमगाव येथील उपकेंद्रावर गडचिरोलीवरून आलेले महावितरण कार्यकारी अभियंता डोंगरवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेश वाशिमकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेराव घातला. ढोलडोंगरी येथील मंजूर असलेले ३३ केव्ही उपकेंद्र केव्हा उभारणार?, अशी विचारणा केली. यावेळी धानोराचे उपकार्यकारी अभियंता देशोपाल शेंडे, मुरुमगावचे कनिष्ठ अभियंता चेतन लांडगे, कोरची तहसीलचे महसूल निरीक्षक प्रमोद धाईत, धानोराचे नायब तहसीलदार, मुरुमगावचे पोलीस उपनिरीक्षक गणेश आठवे उपस्थित होते.

कोणी अडवले उपकेंद्राचे काम?

ढोलडोंगरी येथे मंजूर असलेल्या ३३ केव्ही वीज वितरण उपकेंद्राचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना वारंवार वीज पुरवठ्याची समस्या उद्भवत आहे. यात आमचा काय दोष?, असा सवाल अधिकाऱ्यांना केला. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, तत्कालीन सरकारने ढोलडोंगरी येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे काम मंजूर केले. या कामासाठी ७ कोटीचा निधीही आलेला आहे. कामाचे टेंडर होऊन दोन कंत्राटदारांना हे कामही दिले होते, परंतु नवीन सरकारने या सध्या कोणतेही नवीन काम सुरू न करण्याबाबत आदेश काढले आहे. त्यामुळे हे काम अजूनपर्यंत सुरू झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

लिखित स्वरुपात हमी द्या

संतप्त नागरिकांनी उपकेंद्र उभारणीचे काम केव्हा सुरू करणार याची लिखित स्वरूपात हमी द्या, अशी मागणी कार्यकारी अभियंता डोंगरवार यांना केली. त्यावर आपण लिखित स्वरूपात देऊ शकत नाही, परंतु, १५ ते ३० दिवसांचा वेळ द्या, कामाला लवकरच सुरुवात करू, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु आतापर्यंत आम्ही अनेक आंदोलने करूनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता आमची समस्या सुटणार नाही तोपर्यंत येथून जाणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.

मुक्कामासाठी नागरिकांनी ठोकले तंबू

वीज उपकेंद्राच्या कामाचा एकदा सोक्षमोक्ष लावायचाच या निर्धाराने आलेल्या नागरिकांनी उपकेंद्र परिसरातच तंबू ठोकून मुक्कामाची व्यवस्था केली होती. शुक्रवारला छत्तीसगड ते महाराष्ट्र मार्गावर चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे त्यांनी वरिष्ठांना सांगितले. यामुळे परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: Work of sanctioned sub-centre stopped, citizens of 45 villages in kotagul area protested at Murumgaon Mahavitaran Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.