आलापल्लीच्या रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू
By admin | Published: May 27, 2016 01:28 AM2016-05-27T01:28:37+5:302016-05-27T01:28:37+5:30
येथील वार्ड क्रमांक ५ मधील साई मंदिर परिसरातील सिमेंट रोडच्या कडेला मुरूम टाकण्याचे काम सुरू झाले असून ...
आलापल्ली : येथील वार्ड क्रमांक ५ मधील साई मंदिर परिसरातील सिमेंट रोडच्या कडेला मुरूम टाकण्याचे काम सुरू झाले असून याबाबत काही दिवसाअगोदर लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.
आलापल्ली शहरातील सर्वात वर्दळीचा रस्ता वार्ड क्रमांक ५ मधील साई मंदिर मार्ग गोंड मोहल्ला असून या मार्गावर तीन कॉन्व्हेंट, एक अंगणवाडी, एक प्राथमिक शाळा, एक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय व एक महिला महाविद्यालय आहे. या मार्गावर साई मंदिर असल्याने सदैव वर्दळ असते. परंतु येथील सिमेंट रोडचे बांधकाम करून चार वर्षाचा कालावधी उलटत आला असला तरी या सिमेंट रोडच्या कडा मुरूम टाकून भरण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही या समस्येकडे ग्रामपंचायतीने लक्ष दिले नव्हते. काही दिवसांपूर्वी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर २५ मे पासून मुरूम टाकण्याचे काम ग्रामपंचायतकडून सुरू करण्यात आले आहे. याच मार्गावर साई मंदिर समोर अंगणवाडी असून तेथे चौरस्ता आहे. तेथे गतिरोधक देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)