पलसगड-भीमनपायली रस्त्याचे काम सुरू
By admin | Published: April 19, 2017 02:19 AM2017-04-19T02:19:39+5:302017-04-19T02:19:39+5:30
कुरखेडा पंचायत समितीअंतर्गत पलसगड ग्राम पंचायतीच्या वतीने पलसगड-भीमनपायली या रस्त्याचे माती काम
रोहयोतून १४ लाखांचे काम
होणार : ३०० मजुरांना मिळाला रोजगार
पलसगड : कुरखेडा पंचायत समितीअंतर्गत पलसगड ग्राम पंचायतीच्या वतीने पलसगड-भीमनपायली या रस्त्याचे माती काम महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून सुरू करण्यात आले आहे. १४ लाख रूपयांच्या निधीतून सदर रस्ता तयार होणार आहे. या कामामुळे नोंदणीकृत ३०० मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे.
गतवर्षी रोजगार हमी योजनेअंतर्गत पलसगड-भीमनपायली या रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र गतवर्षी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. मात्र या वर्षी सदर रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे. कामाचा प्रारंभ करताना पलसगड ग्राम पंचायतीचे सरपंच उमाजी धुर्वे, उपसरपंच मीनाक्षी गेडाम तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. पावसाळ्याच्या कालावधीत या रस्त्यावर पाणी साचून चिखल निर्माण होत होता.
परिणामी ये-जा करण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. रोजगार हमी योजनेतून मंजूर केलेले सदर रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून तसेच रोहयो मजुरांकडून सातत्याने होत होती. त्यामुळे आता ग्राम पंचायत प्रशासनाने पलसगड-भिमनपायली या रस्त्याचे काम सुरू केले आहे. कुरखेडा तालुक्यात अनेक ग्राम पंचायतीच्या वतीने मजुरांना रोजगार देण्याच्या उद्देशाने गेल्या काही दिवसांपासून शेततळे, बोडी, मजगी, रस्ते आदींचे कामे जोमात सुरू आहे. (वार्ताहर)