१,२६१ कोटींची कामे होणार
By Admin | Published: May 19, 2016 01:06 AM2016-05-19T01:06:54+5:302016-05-19T01:06:54+5:30
१६ मे रोजी सोमवारी जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण....
४०९.२२ मनुष्य दिवस मिळणार रोजगार : रोहयोचा वार्षिक नियोजन आराखडा मंजूर
दिलीप दहेलकर गडचिरोली
१६ मे रोजी सोमवारी जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नरेगा विभागामार्फत तयार करण्यात आलेला सन २०१६-१७ चा वार्षिक नियोजन आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार सन २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यात १२६१ कोटी ८९ लाख ९० हजार रूपयांच्या निधीतून तब्बल ५५ हजार ८३५ कामे होणार असून या कामातून ४०९.२२ मनुष्य दिवस रोजगार प्राप्त होणार आहे.
२ फेब्रुवारी २००६ पासून महाराष्ट्र राज्याच्या १२ जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१६-१७ या चालू वर्षात करावयाच्यसा कामाची निवड ग्रामपंचायतीमधून झालेली आहे. तसेच पूर नियंत्रण व पूर संरक्षण आदी प्रकारच्या कामांना पंचायत समिती स्तरावरील संवर्ग विकास अधिकाऱ्यांची मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यानंतर १२ ही पंचायत समिती स्तरावर मंजूर करण्यात आलेल्या रोहयो कामाच्या वार्षिक आराखड्यास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे अत्यावश्यक आहे.
त्यानुसार जि.प.च्या नरेगा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चालू वर्षाच्या रोहयो कामाचा नियोजन आराखडा सोमवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत सादर केला. या नियोजन आराखड्याला जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी सर्वानूमते मंजुरी प्रदान केली.
रोजगार हमी योजनेच्या कामाचा सन २०१६-१७ च्या मंजूर नियोजन आराखड्यात बाराही पंचायत समितीतील एकूण ४६७ ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे व ५० टक्के ग्रामपंचायत व ५० टक्के यंत्रणास्तरावर कामांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण ५५ हजार ८३५ कामांपैकी ४२ हजार ११५ कामे ग्रामपंचायतस्तरावर तर १३ हजार ७२० कामे यंत्रणास्तरावर करण्यात येणार आहे.
येत्या दोन दिवसात कामे सुरू होणार
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत गतवर्षी सन २०१५-१६ च्या मंजूर नियोजन आराखड्यातील मंजूर कामे पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींना चालू वर्षात मंजूर करण्यात आलेल्या नियोजन आराखड्यातील कामांना सुरूवात करता येणार आहे. ज्या ग्रा.पं.मध्ये गतवर्षीच्या आराखड्यातील मंजूर कामे अपूर्ण स्थितीत आहेत, अशा ग्रा.पं.नी आधी जुनी अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी केले आहे. त्यामुळे गतवर्षीचे काम पूर्ण केलेल्या ग्रामपंचायती लवकरच चालू वर्षातील मंजूर कामे हाती घेणार आहेत.