पं.स.मध्ये कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 05:00 AM2020-06-17T05:00:00+5:302020-06-17T05:01:11+5:30
निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता शेंडे यांचा सीएल अर्ज १६ जून रोजी प्राप्त झाला. सदर अर्ज गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्याकडे सादर केला असता, त्यांनी शेंडे यांच्या विरोधात अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. तसेच डाकेतून आलेला अर्ज तुम्ही का स्वीकारला, अशी विचारणा सहायक प्रभारी अधिकारी यांना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्यावर कारवाई करावी, या मुख्य मागणीसाठी सिरोंचा पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन पुकारून कार्यालयासमोर धरणे दिली. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता शेंडे यांचा सीएल अर्ज १६ जून रोजी प्राप्त झाला. सदर अर्ज गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्याकडे सादर केला असता, त्यांनी शेंडे यांच्या विरोधात अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. तसेच डाकेतून आलेला अर्ज तुम्ही का स्वीकारला, अशी विचारणा सहायक प्रभारी अधिकारी यांना केली.
गटविकास अधिकारी हे अशाच पद्धतीने अनेक कर्मचाऱ्यांना मानहानी होईल, अशी वर्तणूक करतात. त्यामुळे सिरोंचा पंचायत समितीचे कर्मचारी कमालीचे त्रस्त झाले आहेत. १ जून रोजी तहसीलदारांनी सिरोंचा येथे कन्टेनमेंट झोन घोषित केले. या झोनमध्ये असलेल्या महिला परिचराला गटविकास अधिकारी कार्यालयात बोलवित आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. कोरोनाशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेतूपुरस्सर कारणे दाखवा नोटीस बजावली जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून सिरोंचा येथे अपंग मेळावा आयोजित केला होता. मात्र गटविकास अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे या अपंग मेळाव्याला गालबोट लागले. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यासाठी गटविकास अधिकारी पैसा किंवा वस्तूंची मागणी करतात. मासिक सभेच्या ठरावानुसार अंमलबजावणी केली जात नाही. महिला कर्मचाºयांना स्वत:च्या कक्षात ताटकळत उभे ठेवले जाते, असा आरोप निवेदनातून केला आहे.
आंदोलन सुरूच राहणार
कुणाल उंदीरवाडे हे गडचिरोली पं.स.मध्ये होते. त्यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांची बदली सिरोंचा येथे केली. येथे सुद्धा ते मनमानी करीत आहेत. त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत कामबंद सुरूच ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
एका कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याची कुणकुण लागल्यामुळे काही लोकांनी मुद्दाम हे आंदोलन उभे करून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. कर्मचाºयांनी कसेही वागावे आणि मी कारवाई करू नये अशी त्यांची इच्छा आहे का? हा चुकीचा पायंडा आहे.
- कुणाल उंदीरवाडे, गटविकास अधिकारी, सिरोंचा