तीन सभापतींचे आवारातून कामकाज
By admin | Published: June 1, 2016 02:02 AM2016-06-01T02:02:19+5:302016-06-01T02:02:19+5:30
नगर पंचायतीच्या सर्व सभापतींना व मुख्याधिकाऱ्यांना बसून कामकाज सांभाळण्यासाठी स्वतंत्र कक्षाची गरज आहे.
एटापल्लीतील प्रकार : नगर पंचायतीच्या विद्यमान इमारतीत जागेचा अभाव
एटापल्ली : नगर पंचायतीच्या सर्व सभापतींना व मुख्याधिकाऱ्यांना बसून कामकाज सांभाळण्यासाठी स्वतंत्र कक्षाची गरज आहे. नव्हे तो त्यांचा अधिकार आहे. मात्र अपुऱ्या जागेअभावी नगर पंचायतीचे पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती जितेंद्र टिकले, महिला व बालकल्याण सभापती सगुणा हिचामी, बांधकाम सभापती दीपयंतीप् पेंदाम यांना नगर परिषदेच्या खुल्या आवारात खुर्च्या व टेबल लावून कामकाज करावे लागत आहे. सदर प्रकार एटापल्ली नगर पंचायतीमध्ये पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे या नगर पंचायतीत कार्यरत मुख्याधिकाऱ्यांना स्वतंत्र कक्ष नाही. नगर पंचायत अस्तित्वात येऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र नगर पंचायतीच्या नव्या इमारत बांधकामास मंजुरी मिळाली नाही. परिणामी नगर पंचायतीचा कारभार चालविण्यासाठी पदाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १९६१ मध्ये एटापल्ली ग्रा. पं. ची स्थापना झाली. त्यावेळी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर वनकार्यालयाजवळ ग्रामपंचायतीची कौलारू इमारत बांधण्यात आली. तब्बल २३ वर्षानंतर या कौलारू इमारतीची दुरूस्ती १९९४ मध्ये करून स्लॅबचे छत तयार करण्यात आले. २३ एप्रिल २०१५ पासून ग्रा. पं. ला नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला. मात्र तेव्हापासून नगर पंचायतीचा कारभार ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीतून सुरू आहे. येथील मुख्याधिकारी आर. बी. मेश्राम यांच्यासह तीन सभापती जागेअभावी मिळेल त्या ठिकाणी खुर्च्या-टेबल लावून कामकाज करीत असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.
पाणीपुरवठा सभापती रमेश टिकले, महिला व बालकल्याण सभापती सगुणा हिचामी खुल्या आवारात टेबल-खुर्च्या लावून काम करताना दिसून आले. नगर पंचायतीच्या इमारतीत तीन खोल्या असून एका खोलीत कर्मचारी काम करतात. याच खोलीमध्ये संगणक व इतर साहित्य आहे. याच खोलीत मासिक सभा व इतर बैठका घेतल्या जातात. दुसऱ्या खोलीत मुख्याधिकारी व सभापतींचे कामकाज चालविले जाते. कामकाज सुरळीत होण्यासाठी शासनाने नगर पंचायतीच्या नव्या इमारतीसाठी जागा शोधून मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी पाणीपुरवठा सभापती जितेंद्र टिकले यांनी केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)