वैरागड किल्ल्याचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:38 AM2019-04-12T00:38:00+5:302019-04-12T00:38:42+5:30
आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाची उदासीनता या कामात वारंवार पहावयास मिळत असल्याने सदर काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाची उदासीनता या कामात वारंवार पहावयास मिळत असल्याने सदर काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या किल्ल्याच्या दुरूस्तीचे काम करणारे कारागिर स्वगावी राजस्थानात होळी सणानिमित्त परतल्याने पुन्हा काम लांबणीवर जाण्याची शक्यता वैरागडवासीय व्यक्त करीत आहेत.
वैरागड येथे विराट राजाचा ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाची मागणी गाववासीयांकडून होत असताना भारतीय पुरातत्त्व विभागाने या मान्यता दिली. चंद्रपूर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने मागील चार वर्षांपासून किल्ल्याच्या सौंदर्यीकरणास सुरूवात झाली. पहिल्यावर्षी किल्ल्यावरील झाडे-झुडपे तोडणे व किल्ल्याची साफसफाई करण्यात आली. स्वच्छतेसाठी काही सामाजिक संस्थासुद्धा या कामी लागल्या. त्यानंतर बाहेर राज्यातून कारागिर बोलाविण्यात आले. या कामाला सुरूवात झाली. सध्या केवळ २५ टक्केच काम झाले आहे. विशेष म्हणजे केवळ गेटचेच काम झाल्याचे दिसून येते.
चार वर्षांत किल्ल्याची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु बाहेरून कारागिर बोलाविले जातात. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील यंत्रणा त्यावर देखरेख व नियंत्रण ठेवत असल्याने दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
किल्ल्याच्या कामासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तो कामावर खर्चसुद्धा केला जात आहे. परंतु कामाला गती मिळताना दिसून येत नाही. किल्ल्याची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम करणारे कारागिर राजस्थानातील असल्याने ते यंदाची होळी व रंगपंचमी साजरी करण्याकरिता स्वगावी परतले. विशेष म्हणजे ते केवळ सहा महिने काम करतात. सध्या कडक उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने ते एवढ्यात तरी परत येतील, याची शाश्वती कमी असल्याचे गावातील नागरिकांमध्ये बोलले जात आहे. वैरागड येथे अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत. या ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याची मागणी होत असतानाच किल्ल्याचे काम संथगतीने होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वैरागड येथील अन्य ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा विकास केव्हा होईल, अशी शंका या भागातील नागरिक उपस्थित करीत आहे. त्यामुळे किल्ल्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विविध आकारांच्या विहिरी
वैरागडच्या ऐतिहासिक किल्ल्याला १८ बुरूजे आहेत. प्रत्येक बुरूज विशिष्ट अंतरावर उभा आहे. किल्ल्याच्या आतील भागात ८ विहिरी आहेत. परंतु प्रत्येक विहीर त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षट्कोन, अष्टकोन , पूर्णगोल यासारख्या आकारात आहे. विहिरी ३२, ३५, ४० फूट खोल असल्याचे दिसून येतात. या विहिरींच्या बांधकामावरून त्या काळातील विहीर बांधकाम कला दिसून येते. या विहिरीच्या परिसरातील संपूर्ण कचरा काढण्यात आलेला आहे. तसेच संपूर्ण स्वच्छता करण्यात आलेली आहे.