काम सुरू झाल्याशिवाय हटणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:00 AM2017-10-18T00:00:35+5:302017-10-18T00:00:49+5:30
राष्टÑीय महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याशिवाय महामार्गावरचे अतिक्रमण हटविले जाणार नाही, असा इशारा अतिक्रमणधारकांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : राष्टÑीय महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याशिवाय महामार्गावरचे अतिक्रमण हटविले जाणार नाही, असा इशारा अतिक्रमणधारकांनी दिला आहे.
केंद्र शासनाने वडसा-गडचिरोली-आष्टी-सिरोंचा हा राष्टÑीय महामार्ग मंजूर केला आहे. या महामार्गाच्या कामाला अजूनपर्यंत सुरुवात झाली नाही. तरीही अतिक्रमणधारकांना बांधकाम विभागाच्या वतीने नोटीस पाठविली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांनी अतिक्रमीत छोट्या दुकानदारांसोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान जोपर्यंत महामार्गाचे काम सुरू होणार नाही, तोपर्यंत दुकानदार अतिक्रमण हटविणार नाही, असा इशारा दिला.
आष्टी येथे काही दुकानदारांनी पक्के अतिक्रमण केले आहे. लहान दुकानदारांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जात असेल तर मोठ्याही दुकानदारांचे अतिक्रमण काढावे, अशी मागणी लहान दुकानदारांनी केली आहे. अतिक्रमण हटविल्यास शेकडो युवक बेरोजगार होणार आहेत. या युवकांना व्यवसाय थाटण्यासाठी नदी किनाºयालगत पेपर मिलच्या जागेवर असलेल्या स्मशान शेड देण्याची मागणी केली. आ. डॉ. देवराव होळी यांनी स्मशान शेडच्या जागेची पाहणी करून यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. स्मशान शेडची जागा व्यावसायिकांना दिल्यास अंत्यसंस्कारासाठी अडचण होणार नाही, याचीही दखल घेतली जाईल.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यावसायिकांना गाळे बांधून दिले जातील, असे आश्वासन आ. डॉ. देवराव होळी यांनी दिले. यावेळी संजय पांडे, दिलीप शेख, माजी ग्रा.पं. सदस्य वृंदा नामेवार, शकुर, मनोहर लहांगे, बावणे, रवी नामेवार, विनोद चांदेकर उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील तालुकास्तरावरील शहरांमधून राष्टÑीय महामार्ग जात आहे. रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान थाटलेल्यांची इमारत जमीनदोस्त केली जाणार आहे. त्यामुळे मार्गाच्या बाजूला अतिक्रमण करून इमारत बांधलेल्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.