गोदावरी नदीमार्गे मजुरांचा गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 06:40 PM2020-04-28T18:40:39+5:302020-04-28T18:44:46+5:30
तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर गोदावरी नदीमार्गे विविध घाटांवरून परतण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी एकाच दिवशी सुमारे २०४ मजुरांनी गोदावरीमार्गे सिरोंचा तालुक्यात प्रवेश केला. या सर्वांना ताब्यात घेऊन आठ आश्रयगृहात क्वॉरंटाईन करून ठेवण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर गोदावरी नदीमार्गे विविध घाटांवरून परतण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी एकाच दिवशी सुमारे २०४ मजुरांनी गोदावरीमार्गे सिरोंचा तालुक्यात प्रवेश केला. या सर्वांना ताब्यात घेऊन आठ आश्रयगृहात क्वॉरंटाईन करून ठेवण्यात आले.
सिरोंचा व तेलंगणा राज्याची सीमा गोदावरी व प्राणहिता नदीने विभागल्या गेली आहे. लॉकडाऊन उठण्याची शक्यता मावळली असल्याने मिरची तोडणी व इतर कामासाठी गेलेले मजूर आता गोदावरी व प्राणहिता नदीमार्गे परतायला सुरूवात झाली आहे. गोदावरी नदीवरील कालेश्वर, पेंटीपाका, पोचमपल्ली, वडधम, अंकिसा, आसरअल्ली या नदी घाटांवरून पाणी कमी आहे. यामार्गे मजूर सिरोंचा तालुक्यात प्रवेश करीत आहेत.
दर दिवशी मजुरांची झुंबड सिरोंचा तालुक्यात प्रवेश करीत आहे. रविवारी एकाच दिवशी सुमारे २०४ मजुरांनी सिरोंचा तालुक्यात प्रवेश केला. सदर मजूर हैदराबाद, जनगाम, खंमाम या शहरामध्ये काम करण्यासाठी गेले होते. त्यापैकी ११७ मजूर मध्यप्रदेशात जाण्यासाठी निघाले. ते बालाघाटला जाणार होते, तर काही मजूर चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील होते.
मजूर येत असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच आरोग्य व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिरोंचा शहराबाहेर त्यांना अडवून त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यांना त्याच ठिकाणी क्वॉरंटाईन ठेवले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नदीमार्गे मजूर सिरोंचा तालुक्यात प्रवेश करीत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नागरिकांनी घाबरू नये. बाहेरून येणाºया प्रत्येक मजुराची आरोग्य तपासणी केली जात आहे, अशी माहिती अधिकाºयांनी दिली.
आठ इमारतींमध्ये आश्रयगृह
तालुका प्रशासनाने सिरोंचा शहरातील आठ ठिकाणी आश्रयगृह (शेल्टर होम) तयार केले आहेत. या ठिकाणी दुसºया जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्या नागरिकांना क्वॉरंटाईन ठेवले जाणार आहे. सिरोंचात सद्य:स्थितीत सुमारे ४१८ मजूर क्वॉरंटाईन आहेत, अशी माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली.