सात गावातील मजुरांना तेंदूपत्त्याचे पैसे मिळालेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 05:00 AM2021-08-19T05:00:00+5:302021-08-19T05:00:39+5:30
तेंदूपत्ता मजुरीचे पैसे बाेनससह लवकर मिळतील, अशी अपेक्षा मजुरांना हाेती; परंतु मजुरांचा हिरमाेड झाला. आधीच झिंगानूर परिसरात राेजगाराच्या साधनांचा अभाव आहे. शेतीच्या भरवशावर नागरिक उपजीविका करतात. सिंचनाच्या साधनांचा अभाव असल्याने केवळ पावसाळी शेती केली जाते. कोणत्याही प्रकारचे दुबार पीक घेतले जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यात हमखास उत्पन्न देणारा हंगाम म्हणून तेंदूपत्ता संकलन केले जाते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
झिंगानूर : सिराेंचा तालुक्यातील झिंगानूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सात गावातील मजुरांनी मागील हंगामात आठ दिवस तेंदूपत्ता संकलनाचे काम केले हाेते. यापैकी ३ दिवसांची मजुरी संबंधित कंत्राटदाराने दिली; परंतु ५ दिवसांची मजुरी अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे या गावातील मजूर मजुरीपासून वंचित आहेत. सध्या मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मजुरी लवकर द्यावी, अशी मागणी सात गावातील मजुरांनी केली आहे.
झिंगानूर ग्रामपंचायत अंतर्गत झिंगानूर चेक नंबर १, झिंगानूर चेक नं. २, झिंगानूर माल, मंगीगुडम, पुल्लीगुडम, वडदेली, येडसिली आदी गावातील मजुरांनी तेंदूपत्ता संकलनाचे काम केले. तेंदूपत्ता मजुरीचे पैसे बाेनससह लवकर मिळतील, अशी अपेक्षा मजुरांना हाेती; परंतु मजुरांचा हिरमाेड झाला. आधीच झिंगानूर परिसरात राेजगाराच्या साधनांचा अभाव आहे. शेतीच्या भरवशावर नागरिक उपजीविका करतात. सिंचनाच्या साधनांचा अभाव असल्याने केवळ पावसाळी शेती केली जाते. कोणत्याही प्रकारचे दुबार पीक घेतले जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यात हमखास उत्पन्न देणारा हंगाम म्हणून तेंदूपत्ता संकलन केले जाते.
सध्या खरीप हंगाम असल्याने शेतीसाठी कीटकनाशके, खते व अन्य वस्तू खरेदी कराव्या लागतात. शिवाय मजुरांना मजुरी द्यावी लागते. यासाठी पैसे आवश्यक आहेत. परिसरात राेजगार नसल्याने शेतीच्या भरवशावरच मजुरांना अवंलबून राहावे लागते. सध्या शेतकऱ्यांजवळ पैसा उपलब्ध नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने तेंदूपत्त्याची मजुरी लवकर द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कंत्राटदार झाला गायब
- झिंगानूरच्या ग्रामपंचायतमध्ये कंत्राटदाराच्या उपस्थितीत हंगामापूर्वी लिलाव प्रक्रिया पार पडली हाेती. प्रती पुडा ११ रुपये प्रमाणे शेकडा १ हजार १०० रुपये दर तेंदूपत्त्याला मिळाला. उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केल्यानंतर लगेच पैसे दिले जातील, असे संबंधित कंत्राटदाराने सांगितले हाेते. मजुरांनी याच शब्दावर अनेक महिने प्रतीक्षा केली; परंतु कंत्राटदार पैसे देण्यासाठी फिरकला नाही. आठ दिवसांच्या कामापैकी केवळ तीन दिवसांचे पैसे मजुरांना मिळाले. उर्वरित ५ दिवसांचे पैसे कंत्राटदाराने मजुरांना दिले नाही. त्यामुळे मजूर अनेक दिवसांपासून पैसे मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत.