तेंदूपत्ता तोडणी करताना मजुरांनी विशेष काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:36 AM2021-05-13T04:36:53+5:302021-05-13T04:36:53+5:30
गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाला काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. रविवारी आरमोरी तालुक्यातील सालमारा येथील तेंदूपत्ता मजुरावर अस्वलाने हल्ला ...
गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाला काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. रविवारी आरमोरी तालुक्यातील सालमारा येथील तेंदूपत्ता मजुरावर अस्वलाने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले, तर सोमवारी तेंदूपत्ता ताेडणाऱ्या कुऱ्हाडी व महादवाडी येथील दाेन महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्या. तेंदूपत्ता संकलन करताना नेहमी मानव व प्राणी यांच्यातील संघर्ष पाहायला मिळतो आणि या संघर्षात मानव किंवा प्राणी यांना नाहक आपला प्राण गमवावा लागतो. तेंदूपत्ता गोळा करताना जंगलातील साप, अस्वल, वाघ व अन्य वन्यजीवांपासून धोका होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तेंदूपत्ता कंत्राटदाराने शासनाने नमूद केलेल्या अटी व शर्तींचे पालन करून तेंदूपत्ता मजुरांचे संरक्षण व्हावे यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. उन्हाळा असल्याने वन्यजीव पिण्याच्या पाण्याच्या शोधाकरिता भटकंती करतात. अशात काही प्राणी थंड ठिकाणी, तर काही प्राणी झुडपाचा आधार घेऊन विश्रांती घेत असतात. आपल्याला त्याची कल्पना नसल्याने आपण बिनधास्त झुडपात पाने तोडायला जातो. अशावेळी धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावापासून तेंदूपत्ता तोडण्याकरिता १० ते १५ कि.मी. अंतरावर जंगलात जावे लागत असल्याने वेळीच उपचार न मिळाल्यास जीवही गमवावा लागतो.
बाॅक्स
हे टाळावे
तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी एकट्याने जंगलात जाऊ नये, तीन किंवा चारच्या गटाने आवाज करीत जावे, जंगलात चाैफेर नजर असावी, शरीरयष्टीने कमकुवत व्यक्तीने जंगलात जाऊ नये. पाणवठ्यांजवळ वाघ राहण्याची शक्यता असते. त्यामुळे हा परिसर टाळावा. काेणत्याही वन्यप्राण्यावर हल्ला करू नये, कारण ताे चवताळून इतरांवर हल्ला करू शकताे. जंगलात आग लावू नये. वनविभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये.