काँग्रेसच्या मजबुतीसाठी कार्यकर्त्यांची ताकद आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:45 AM2017-09-23T01:45:11+5:302017-09-23T01:45:27+5:30
काँग्रेस पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद महत्त्वाची असल्याने कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा,....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : काँग्रेस पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद महत्त्वाची असल्याने कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन काँग्रेस जिल्हा निवडणूक अधिकारी रामगोपाल भवानीया यांनी केले.
काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांना सुरुवात झाली आहे. याबाबतचा आढावा घेण्याबरोबरच निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी आरमोरी मार्गावरील मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी १२ वाजता निवडणूक बैठक घेण्यात आली. या बैठकीप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला काँग्रेसचे गडचिरोली निरीक्षक सुरेश भोयर, माजी खा. मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, रवींद्र दरेकर, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, माजी आ. पेंटारामा तलांडी, सगुणा तलांडी, पं. स. सभापती दुर्लभा बांबोळे, जि. प. सदस्य वैशाली ताटपल्लीवार, जि. प. सदस्य अॅड. राम मेश्राम, पंकज गुड्डेवार, समशेर खॉ पठाण, नगरसेवक तथा काँग्रेस गडचिरोली शहराध्यक्ष सतीश विधाते, रजनीकांत मोटघरे, नितेश राठोड, प्रकाश देवतळे, प्रभाकर वासेकर, मधुकर चितडे, माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, हरीश मोटवानी, ऐजाज शेख, पांडुरंग घोटेकर, मनोहर पोरेटी, काशिनाथ भडके, चंदू वडपल्लीवार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना रामगोपाल भवानीया म्हणाले, केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपा विरोधात नागरिकांच्या मनामध्ये लाट निर्माण झाली आहे. भाजपा सरकारने लोकशाहीची हत्या करण्याचे काम केले आहे. रोजगाराचे केवळ आश्वासन युवकांना देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात बेकारीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. काँग्रेस पक्षाने लोकशाही जीवंत ठेवली आहे. काँग्रेस पक्षाविषयी जनतेचा विश्वास अजूनही कमी झाला नाही. फक्त त्याला योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रामगोपाल भवानीया यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनीसुद्धा भाजपा सरकारवर टीकेचा आसूड ओढला. संचालन काँग्रेसचे जिल्हा सचिव एजाज शेख तर आभार शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते यांनी मानले.