बांबू मिळत नसल्याने कामगार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:38 AM2021-03-23T04:38:45+5:302021-03-23T04:38:45+5:30
कुंभार समाजासाठी मंडळ स्थापन करावे अहेरी : कुंभार समाजासाठी संत गोरोबा काका माती कला बोर्डाची स्थापना करावी, कुंभार समाजाचा ...
कुंभार समाजासाठी मंडळ स्थापन करावे
अहेरी : कुंभार समाजासाठी संत गोरोबा काका माती कला बोर्डाची स्थापना करावी, कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करावा, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्ण माफ करावी, वाहतूक व वीटभट्टी परवान्यातील जाचक अट रद्द करावी, कुंभार समाजाला ओळखपत्रावर परवाना व जळावू लाकूड देण्याची मागणी कुंभार समाज महासंघाने केली आहे.
रेडिअमअभावी अपघाताची शक्यता
देसाईगंज : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडिअम लावले नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे वाहनचालकांना रात्रीच्यावेळी समोरील रस्ता दिसत नाही.
जंगलव्याप्त परिसरात फिरणे टाळा
गडचिराेली : पहाटेच्यासुमारास फिरायला गेलेले अनेकजण वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले असल्याच्या घटना घडत आहेत. त्या टाळण्यासाठी जंगलाव्याप्त परिसरात अंधाराच्या वेळेस फिरायला जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागातर्फे केले आहे.
कोरोनाच्या संकटात डासांचा डंख
कुरखेडा : मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या नागरिक कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या प्रकृतीची काळजी घेत आहे.
दुरुस्तीअभावी तलावांची दुरवस्था
चामाेर्शी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय कमी आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरूस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच शेती करावी लागत आहे. सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेला मामा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तलावांची दुरूस्ती करावी.
दूध शीतकरण केंद्र सुरू करा
गडचिरोली : नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने हे शितकरण केंद्र सध्या बंद आहे. दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावेत.
मणक्याचे आजार वाढले
सिराेंचा : तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवास करताना विविध अडचणी येतात. यातच विविध आजार वाढले आहेत. याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्याने मणक्याच्या आजारात सुधारणा हाेते.
निवासस्थाने ओस
जोगीसाखरा : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत.
दुर्गम भागातील अनेक गावांना रस्ते नाही
गडचिरोली : जिल्हा निर्मितीला ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही अजूनही शेकडो गावे रस्त्यांनी जोडली गेली नाहीत. या गावांना पायवाटेनेच प्रवास करावा लागत आहे.
रेगडी येथे बँक शाखा सुरू करा
घोट : घोटपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी परिसरात २५ ते ३० गावांचा समावेश आहे. शिवाय येथे पोलीस मदत केंद्र, शासकीय आश्रमशाळा, धर्मराव हायस्कूल, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत.
अनेक वाॅर्डातील नाल्यांची दुरवस्था
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरूस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरूंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच अच्छादन नसल्याने किरकोळ अपघात घडताहेत.
मोहलीचा मनाेरा ठरताेय कुचकामी
धानोरा : तालुक्यातील मोहली बीएसएनएलचा मनोरा आहे; परंतु त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दूधमाळा, गिरोला, गोडलवाही आदी ठिकाणी भ्रमणध्वनी मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्मशानभूमींची दुरवस्था वाढली
कुरखेडा : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी, ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.
मामीडीताेगूजवळ पूल बांधण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामीडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.
भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने या मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी.
पुलाअभावी वाहतूक होते वारंवार प्रभावित
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र या नाल्यावर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच आवागमन करावे लागते. मात्र या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा
गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती केव्हा होणार
गडचिरोली : सिंचाई विभागाच्यावतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत.
नागमाता मंदिराजवळ गतिरोधकाची मागणी
आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावेत, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गतिराेधकाचे बांधकाम अजूनपर्यंत हाेऊ शकले नाही.
अनियमित वीज पुरवठा
घोट : चामोर्शी तालुक्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या घोट परिसरातील मक्केपल्ली भागात विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे अनियमित वीज पुरवठा केला जात आहे. जागोजागी बसविण्यात आलेल्या ट्रान्सफाॅर्मरच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
मोकाट जनावरांचा त्रास
एटापल्ली : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघातांची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
कठड्यांअभावी वृक्षसंवर्धन धोक्यात
एटापल्ली : तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण केले आहे. मात्र या वृक्षांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी कठडे बांधण्यात आले नाहीत. लावलेले वृक्ष जनावरांचे खाद्य बनत चालले आहे.
प्रभारी लाईनमनमुळे नागरिकांना त्रास
अहेरी : जिल्ह्यातील बहुतांश गावात लाईनमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. आता उन्हाळा सुरू असला, तरी दिवसामागे वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वीज सुरळीत करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक गावांसाठी लाईनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
कुरखेडा : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी घातली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेक युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़; मात्र कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे.
कोंडवाड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
आरमाेरी : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहे. मात्र निधीअभावी कोंडवाड्याची दुरवस्था झाल्याने जनावरांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. कोंडवाड्याची दुरुस्ती करणे अडचणीचे होत आहे.
रस्त्यावर कचरा टाकण्यास आळा घाला
गडचिराेली : शहरातील विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाॅर्डातील नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. डासांचे प्रमाण वाढून आजार होऊ शकतात. त्यामुळे नगर परिषदेने स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने वाॅर्डात पाठवावे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
शिंगाडा उत्पादनासाठी हवे अर्थसहाय्य
कुरखेडा : जिल्ह्यातील विविध तालुक्यांत कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात. परंतु, या व्यवसायाकरिता पैशाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मत्स्यपालन बिजाई व सिंगाडा लागवडीकरिता निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मत्स्यपालन सहकारी संस्थांकडून हाेत आहे.
हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत
गडचिराेली : कोरोना लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय ठप्प होते. दरम्यान, प्रशासनाने शिथिलता देत बाजारपेठ सुरू केली आहे. यामध्ये हॉटेल्ससुद्धा सुरू करण्यात आली आहेत. मात्र पाहिजे तसे ग्राहकच फिरकत नसल्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. शहरात तसेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने हॉटेल्स आहेत.
पेट्रोल चोरट्यांचा बंदोबस्त करावा
गडचिराेली : शहरात मागील काही दिवसांपासून पेट्रोल चोरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलचोर शाळा, महाविद्यालय, शहरातील विविध चौक तसेच कॉम्प्लेक्समधील वाहनतळातून पेट्रोल चोरी करतात. पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. रात्रीच्या सुमारास गेटमधून प्रवेश करून चाेरटे पेट्राेल लंपास करीत आहेत.
शासकीय योजनांची माहिती नागरिकांना द्या
एटापल्ली : केंद्र व राज्य शासनाकडून नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांची माहितीच अनेकांपर्यंत पोहोचविली जात नाही़. परिणामी, पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहतात. संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास योग्य माहिती मिळत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.
कोचिंग संचालकांचे आर्थिक नुकसान
अहेरी : गावात क्लास घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या बेरोजगार युवकांचे कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळी येेऊन गेली तरीही शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी अद्यापही शिकवणी लावली नाही. परिणामी गावातील बेरोजगार युवकांचे आर्थिक नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण दिले जात असले, तरी काेचिंग संचालकांचे शुल्क देण्याबाबत विद्यार्थी व पालक उदासीन आहेत.