बांबू मिळत नसल्याने कामगार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:41 AM2021-08-21T04:41:28+5:302021-08-21T04:41:28+5:30
गडचिराेली : तालुक्यात बुरुड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, वनविभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व ...
गडचिराेली : तालुक्यात बुरुड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, वनविभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी बुरुड बांधवांकडून होत आहे. जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात बुरुड कामगार आहेत. ते बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करतात. त्यामुळे बांबू उपलब्ध करावे, अशी मागणी कारागिरांनी केली आहे.
कुंभार समाजासाठी मंडळ स्थापन करावे
अहेरी : कुंभार समाजासाठी संत गोरोबा काका माती कला बोर्डाची स्थापना करावी, कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करावा, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्ण माफ करावी, वाहतूक व वीटभट्टी परवान्यातील जाचक अट रद्द करावी, कुंभार समाजाला ओळखपत्रावर परवाना व जळाऊ लाकूड देण्याची मागणी आहे. कुंभार समाज पारंपरिक व्यवसाय करून, आपली उपजीविका करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी बाेर्डाची स्थापना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अनेक वाॅर्डातील नाल्यांची दुरवस्था
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत, शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने, अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच अच्छादन नसल्याने किरकोळ अपघात घडत आहेत.
याशिवाय नवीन वस्त्या वाढल्या आहेत. त्या वस्त्यांमध्ये नाली व रस्ते बांधकाम करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी हाेत आहे.
मोहलीचा मनाेरा ठरताेय कुचकामी
धानोरा : तालुक्यातील मोहली बीएसएनएलचा मनोरा आहे, परंतु त्याची क्षमता कमी असल्याने, दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दूधमाळा, गिरोला, गोडलवाही आदी ठिकाणी भ्रमणध्वनी मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. परिसरात आठ ते दहा गावांचा समावेश आहे. हा परिसर जंगलव्याप्त असून, दुर्गम आहे. दरवर्षी नागरिक लाेकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना याबाबत सांगतात, परंतु दुर्लक्ष केले जाते.
स्मशानभूमींची दुरवस्था वाढली
काेरची : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली, तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले आहेत. नागरिकांच्या साेयीसाठी स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बहुतांश ठिकाणी बसण्याची, तसेच पिण्याच्या पाण्याची साेय नाही. या दृष्टीने प्रयत्न करावे, अशी मागणी हाेत आहे.
एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले, परंतु अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे निकामी झाले आहेत. चाेरी गेलेल्या साैरदिव्यांच्या खांबांवर नवीन साैरदिव व बॅटऱ्या उपलब्ध कराव्या, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. तालुक्याच्या दुर्गम भागात विजेचीही समस्या आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.