रोहयोतून होणार १२४५ कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:19 AM2019-02-21T01:19:49+5:302019-02-21T01:23:13+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षाच्या वार्षिक नियोजन आराखड्यास नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षाच्या वार्षिक नियोजन आराखड्यास नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली. या आराखड्यानुसार तब्बल १२४५ कोटी ५९ लाख ८० हजार रुपयांची जिल्हाभरात एकूण ७३ हजार ९२३ कामे होणार आहेत.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्याच्या कलम ४ व २८ अन्वये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तयार करण्यात आली आहे. मग्रारोहयो ही योजना महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात २ फेब्रुवारी २००६ पासून लागू करण्यात आली असून यात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसांचा रोजगार देण्याची कायद्यान्वये हमी असलेल्या या योजनेंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कामे केली जातात. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागामार्फत आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या पूर्वी वार्षिक नियोजन आराखडा तयार केला जातो. त्यानुसार यंदाही असा आराखडा तयार करण्यात आला व या आराखड्यास जि.प.च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी प्रदान करण्यात आली. रोजगार हमी योजनेची कामे ५० टक्के ग्रामपंचायत व ५० टक्के यंत्रणास्तरावर दरवर्षी केली जातात. जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नरेगाची कामे प्राधान्याने घेतली जातात. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील एकूण ४५७ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ७३ हजार ९२३ कामे घेण्यात येणार आहे. या कामांसाठी एकूण १२४५ कोटी ५९ लाख ८० हजार रुपयांचा खर्च येणार आहे. जि.प.च्या वतीने तयार करण्यात आलेल्या पुढील आर्थिक वर्षाच्या नियोजन आराखड्यानुसार शासनाकडून प्रस्तावित कामांसाठी निधी प्राप्त होणार आहे. मग्रारोहयोतून सिंचन विहीर, वळण बंधारे, कालव्याची कामे, पिण्याच्या पाण्याची विहीर आदी जलसिंचनाची कामे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय सदर योजनेतून फळबाग, बोळी, मजगी, शेततळे, सिंचन विहीर, शाळा व गावासाठी क्रीडांगण, वैयक्तिक गोठा दुरूस्ती, अंगणवाडी शौचालय, शाळा शौचालय, गांढुळ खत, कंपोस्ट खत आदी कामे होणार आहेत.
३४७ लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचा प्रयत्न
रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायत व यंत्रणास्तरावर कामे करण्यात येणार असून पुढील वर्षाच्या नियोजन आराखड्यानुसार जिल्हाभरात विविध एकूण ७३ हजार ९२३ कामे होणार आहेत. जि.प.च्या नरेगा विभागाने पंचायत समिती व ग्रामपंचायतनिहाय नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार वर्षभरात एकूण ३४७ लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होणार आहे.
ग्रामसभेतून कामांची निवड
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या कामांची निवड ग्रामसभेमधून करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन पुढील आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतून करावयाच्या विविध कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात नोंदणीकृत मजुराच्या मागणीनुसार त्या-त्या ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये रोहयोतून विविध कामे करण्यात येणार आहेत.