गोंडवाना विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा
By admin | Published: October 20, 2016 02:31 AM2016-10-20T02:31:34+5:302016-10-20T02:31:34+5:30
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गोंडवाना विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाला डिजिटल इंडियावर...
कुलगुरूंची माहिती : २०० रासेयो स्वयंसेवकांसह ७० अधिकारी होणार सहभागी
गडचिरोली : भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गोंडवाना विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाला डिजिटल इंडियावर कार्यशाळा आयोजित करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार सदर कार्यशाळा २१ आॅक्टोबर रोजी शुक्रवारला होणार आहे. यामध्ये विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांतील रासेयोचे २०० स्वयंसेवक, २० कार्यक्रम अधिकारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे ३० अधिकारी व शासनाच्या डिजिटल इंडिया विभागाचे २० अधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. जी. व्ही. दळवे, डॉ. नरेश मडावी, डॉ. प्रिया गेडाम उपस्थित होत्या. डिजिटल इंडियावर कार्यशाळा आयोजित करण्यासाठी भारत सरकारच्या सदर मंत्रालयाने देशभरातील १२० विद्यापीठांची निवड केली. यामध्ये महाराष्ट्रातील ५ विद्यापीठांचा समावेश आहे. मुंबई, लातूर तसेच अन्य दोन ठिकाणच्या विद्यापीठांसह गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाला सदर कार्यशाळा आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. या कार्यशाळेत तज्ज्ञ व्यक्ती आभासी सादरीकरण करणार असून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत रासेयो स्वयंसेवकांसाठी प्रहसन, पोस्टर, प्रश्नमंजुषा व वक्तृत्त्व स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहितीही कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी दिली. मोठ्या विकसीत शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी तंत्रज्ञानात मागे राहू नयेत, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्या हस्ते होणार असून राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डॉ. के. व्ही. खादरीनरसिंमया हजर राहणार आहेत.