अहिंसा संदेश वाचनातून होणार जागतिक विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:57 PM2018-02-28T23:57:14+5:302018-02-28T23:57:14+5:30

राज्यात आणि देशात एक नक्षलग्रस्त आणि हिंसक कारवायांनी बरबटलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत अहिंसा आणि शांततेच्या संदेश श्रवणातून जागतिक विक्रम करण्याची तयारी सुरू आहे.

A world record will be heard from non-violence message | अहिंसा संदेश वाचनातून होणार जागतिक विक्रम

अहिंसा संदेश वाचनातून होणार जागतिक विक्रम

Next
ठळक मुद्देसात हजार नागरिकांची उपस्थिती : तुर्कस्तानचा विक्रम मोडणार

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : राज्यात आणि देशात एक नक्षलग्रस्त आणि हिंसक कारवायांनी बरबटलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत अहिंसा आणि शांततेच्या संदेश श्रवणातून जागतिक विक्रम करण्याची तयारी सुरू आहे. त्यात येत्या ३ मार्च रोजी गडचिरोलीच्या पोलीस मैदानावर जिल्हाभरातून येणाऱ्या ७ हजारावर नागरिक, विद्यार्थ्यांना ‘गांधी विचार आणि अहिंसा’ या पुस्तकातील अंश वाचून दाखविला जाणार आहे. एकावेळी एवढ्या श्रोत्यांपुढे एखाद्या लेखकाच्या पुस्तकातील काही भाग वाचून दाखविण्याचा हा प्रसंग गिनीज बुकात नोंदविल्या जाणार असल्याची माहिती बुधवारी प्रभारी पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस प्रशासनासह पुण्याच्या आदर्श मित्र मंडळाने या विश्वविक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना उडान फाऊंडेशन व लक्ष्मीनृसिंह पतसंस्था, बल्लारपूर यांचेही सहकार्य लाभत आहे. पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप, उडान फाऊंडेशनचे डॉ. चरणजितसिंह सलुजा, रोमीत तोम्बर्लावार, लक्ष्मीनृसिंह पतसंस्थेचे श्रीनिवास सुंचूवार हे यासाठी सहकार्य करीत आहेत. या कार्यक्रमात जिल्ह्याच्या विविध भागातील विद्यार्थी, नागरिक, पोलीस पाटील, केंद्रीय राखीव दलाचे आणि राज्य पोलिस दलाचे जवान आदी सहभागी होणार आहेत.
एकाचवेळी एका लेखकाच्या पुस्तकातील अंश ५ हजार ७५० जणांनी श्रवण करण्याचा विश्वविक्रम तुर्कस्तानच्या नावे आहे. मात्र येत्या ३ मार्चला तो विक्रम गडचिरोलीत मोडला जाणार आहे. भारत देशात कोणत्याही ठिकाणी पोलीस विभागाच्या पुढाकारातून अशा प्रकारचा विश्वविक्रम झालेला नाही. त्यामुळे या विश्वविक्रमाने गडचिरोली जिल्ह्याची प्रतिमा नक्की बदलेल, असा विश्वास माहेश्वर रेड्डी यांनी व्यक्त केला. याच दिवशी जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा मेळावाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला सीआरपीएफच्या बटालियन ९ चे कमांडंट रविंद्र भगत, बटालियन १९२ चे कमांडंट मनोजकुमार, अतिरिक्त पो.अधीक्षक राजा रामासामी (अहेरी), महेंद्र पंडीत, डॉ.हरी बालाजी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
१२८ अटींची करावी लागणार पूर्तता
- पत्रपरिषदेत माहिती देताना गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडर््सचे कन्सलटंट मिलींद वेर्लेकर यांनी सांगितले की, एका लेखकाच्या पुस्तकातील उतारा एकाच वेळी सर्वाधिक श्रोत्यांनी ऐकण्याचा हा विश्वविक्रम गिनीज बुकात नोंदविण्यासाठी १२८ अटींची पूर्तता करावी लागणार आहे.
- सर्व अटी पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यासाठी गिनीज बुकाच्या वतीने १० लोकांची एक चमू येणार आहे. यासाठी श्रोते म्हणून उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला बारकोड असलेला बँड मिळणार आहे. त्यावरून उपस्थितांची संख्या अचूकपणे डिजीटल पद्धतीने नोंदविली जाईल.
बिरसा मुंडांच्या वंशंजांचा सन्मान
आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे वंशज (नातू आणि नातवाच्या दोन मुली) तसेच वीर बाबूराव शेडमाके यांचे वंशज या कार्यक्रमात सहभागी होणार असून त्यांचा सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) शरद शेलार, उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे राहणार आहे.
व्हॉलिबॉल सामन्यांच्या अंतिम लढती रंगणार
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गेल्या २६ जानेवारीपासून जिल्ह्याच्या विविध भागात बिरसा मुंडा व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी लढती झाल्या. त्यात जिल्ह्यातील ७५८ व्हॉलिबॉल संघांनी (९०९६ युवकांनी) सहभाग. आता विजेतेपदासाठी ८ संघांत दि.३ ला लढती होणार असून त्यांना बक्षीस वितरण केले जाईल असे यावेळी प्र. पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी सांगितले.
पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र स्तरावर स्पर्धेत भाग घेतलेल्या संघांचे साखळी पद्धतीने सामने पार पडून विजेत्या संघाला उपविभागीय स्तरावरील स्पर्धेत प्रवेश मिळाला. उपविभागीय स्तरावरील स्पर्धा नुकत्याच पार पडल्या असून त्यात ८ संघ विजयी झाले. त्यात नागेपल्ली संघ- उपविभाग अहेरी, धानोरा संघ- उपविभाग धानोरा, असरअल्ली संघ- उपविभाग सिरोंचा, कुरखेडा संघ- उपविभाग कुरखेडा, कोठी संघ- उपविभाग भामरागड, गडचिरोली संघ- उपविभाग गडचिरोली, गट्टा (फु) संघ- उपविभाग पेंढरी आणि रेपनपल्ली छल्लेवाडा संघ- उपविभाग जिमलगट्टा या संघांचा समावेश आहे. या संघांत ३ मार्च रोजी अंतिम विजेतेपदासाठी सामने होणार आहेत. जिल्हास्तरावर विजयी संघांना अनुक्रमे २५ हजार, २० हजार व १५ हजार रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते दि.३ ला सन्मानित केले जाणार असल्याचे यावेळी रेड्डी यांनी सांगितले.

Web Title: A world record will be heard from non-violence message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.