जागतिक मृदा दिवस; मृदा चाचणीतून शेतीत होतोय सकारात्मक बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 08:00 AM2018-12-05T08:00:00+5:302018-12-05T08:00:04+5:30
आज जागतिक मृदा दिनाच्या निमित्याने गडचिरोली जिल्ह्यातील तीन वर्षातील माती परीक्षणाचा शेतकऱ्यांच्या कलाचा आढावा लोकमतच्या प्रतिनिधींनी घेतला आहे.
अतुल बुराडे/विष्णू दुनेदार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: माती म्हणजे जमिनीची त्वचा. मानवी त्वचा प्रत्येक व्यक्ती मुलायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु मातीच्या संदर्भात ही मानसिकता मानवात दिसून येत नाही. माती प्रदूषण हा आता महत्वाचा विषय झाला आहे. पूर्वी शेतात प्रवेश करताच ढेकरे फुटायची व पायाला मुलायमपणाचा भास व्हायचा परंतु आज मात्र हा मुलायमपणा जाणवत नसल्याचे अनुभवी शेतकरी सांगतात. रासायनिक खताच्या अति वापराने मातीचा मुलायमपणा निघून गेला आहे. त्यामुळे माती परीक्षण करणे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. आज जागतिक मृदा दिनाच्या निमित्याने गडचिरोली जिल्ह्यातील तीन वर्षातील माती परीक्षणाचा शेतकऱ्यांच्या कलाचा आढावा लोकमतच्या प्रतिनिधींनी घेतला आहे.
माती परीक्षण हे शेतजमिनीतील अंगभूत रासायनिक व जैविक विश्लेषण होय. याद्वारे शेतात घेण्यात येणाऱ्या पीक खर्चात बचत करुन उत्पादन वाढवता येते. सोबतच पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा निश्चित करता येते. गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. नत्र, पालाश, स्पूरद, तांबे, लोह, मॅग्नीज, जस्त या सारख्या पोषक द्राव्याचा व सूक्ष्म मुलद्रव्याचा शोध घेता येतो. यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते.
आजच्या काळामध्ये शेतकरी बांधव ज्या पद्धतीने रासायनिक खताचा अनिर्बंध वापर करीत आहेत. शेतकरी बांधवांनी नेमका किती रासायनिक खत वापरले पाहिजे याचे कसलेही, कुठे काही बंधन नाही. प्रत्येक शेतकरी आपापल्या पद्धतीने शेतात रासायनिक द्रव्य टाकतात. अमर्यादित असा रासायनिक खताचा वापर शेतात होतो आहे. त्यामुळे शेतजमीनीसाठी योग्य प्रमाणात रासायनिक खताचा वापर, मृदेचे पोषक द्रव्य वाढवून जमिनीचे आरोग्य नियंत्रित, अबाधित ठेवण्याकरिता मृदा परीक्षण गरजेचे आहे.
ज्या प्रमाणे मानवी रक्त चाचणीतून शरीरातील कमी जास्त असलेले विविध घटक तपासले जाते अगदी तसेच जमिनीला सुद्धा आरोग्य असून वेगवेगळे केमिकल्स वापरून मृदा परिक्षणाच्या पद्धतीने जमिनीतील सेंद्रिय कर्ब किती प्रमाणात आहे. हे तपासले जाते. यासाठी पीएच स्केलचा वापर केला जातो.
मृदा परीक्षणासाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध शेत जमिनीच्या चारही कोपऱ्यातील जिथे जनावरे बसत नाही, जिथे पाणी साचलेले नसते, जिथे क्षारयुक्त पाणी राहत नसलेल्या भागातील माती व्ही आकाराचा खड्डा खोदून माती काढली जाते. मृदा परीक्षणासाठी गाव, तालुकास्तरावर प्रचार, जनजागृती केल्यामुळे जमीन आरोग्य अभियान पत्रिका योजनेला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यात फळबाग वगैरे कमी असल्याकारणाने सर्वसाधारण प्रकारची मृदा परीक्षण केले जाते, यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांची तपासणी केली जाते. मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकरी बांधवांचा कल वाढतो आहे. सन २०१७६-१७ ला १९७४४ शेतकऱ्यांनी मृदा परीक्षणाची नमुने प्राप्त केले. तर २०१८-१९ ला २१००४ एवढ्या माती परीक्षणाच्या नमुन्यांचे लक्ष ठेवण्यात आले होते त्यापैकी १८६४० मृदा नमुने प्राप्त झालेले आहेत.
मत्स्यपालन, सेंद्रिय शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. भाताची श्री पद्धतीने लागवड केली जाते आहे. वडसा, आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी, मूलचेरा या तालुक्यांमध्ये मृदा परीक्षणासाठी शेतकऱ्यांचा सर्वात जास्त प्रतिसाद असून मुलचेरा या तालुक्यामध्ये बंगाली बांधव जास्त असल्या कारणाने मत्स पालनासाठी तिथे जास्त उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. वडसा उपविभाग आणि गडचिरोली उपविभागामध्ये शेतकऱ्यांनी मृदा परीक्षण करिता चांगला प्रतिसाद दिलेला आहे. परीक्षणाचा अहवाल शेतकऱ्यांना दिल्या नंतर मातीत कोणते सूक्ष्म मूलद्रव्य, घटक कमी जास्त आहेत त्यानुसार त्याचा योग्य प्रमाणात वापर करुन जिल्ह्यातील शेतकरी फायदा घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते आपल्या उत्पादनात वाढ करत आहेत.
शेतकरी बांधवांना कृषी विभागाकडून जी मृदा आरोग्य पत्रिका दिली जात आहे. मृदा आरोग्य पत्रिकेनुसार खताचा वा इतर घटकांचा संतुलित, समतोल असा वापर करावा. शेतकऱ्यांनी त्याचा भरपूर लाभ घ्यावा आणि आपल्या उत्पादनामध्ये दुपटीने वाढ करावी.
एन. जी. सुपारे,
जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, गडचिरोली