जागतिक पर्यटन दिन : गडचिरोलीतील या पर्यटन स्थळांना भेट दिली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 03:20 PM2024-09-27T15:20:45+5:302024-09-27T15:22:23+5:30

Gadchiroli : पर्यटकांचा वाढू शकतो ओढा; 'झाडी'त दडलंय सौंदर्य; पण विकास होईना !

World Tourism Day: Have you visited these tourist spots in Gadchiroli? | जागतिक पर्यटन दिन : गडचिरोलीतील या पर्यटन स्थळांना भेट दिली का?

World Tourism Day: Have you visited these tourist spots in Gadchiroli?

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
घनदाट जंगल, डोंगरदऱ्या पहाड, बारमाही वाहणाऱ्या नद्या यामुळे नैसर्गिकरीत्या पर्यटनस्थळ निर्माण झाले. बारमाही पर्यटनाची संधी असलेला गडचिरोली जिल्हा पर्यटकांना आकर्षित करतो. येथील पर्यटनस्थळांच्या विकासाला वाव मिळाल्यास पर्यटकांचा ओढा वाढू शकतो. जागतिक पर्यटन दिनानिमित्त जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा घेतलेला हा आढावा.


गडचिरोली हा नक्षलप्रभावित जिल्हा आहे. याच कारणाने जिल्ह्यातील पर्यटनाला गालबोट लागले आहे. पर्यटनस्थळे असतानाही त्यांचा विकास झालेला नाही. नक्षल समस्या यासाठी कारणीभूत असली तरी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास झाला नाही. तसेच पर्यटनाला चालना मिळाली नाही. जिल्ह्यात मार्कंडादेव हे महत्त्वाचे धार्मिक तीर्थस्थळ आहे. आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे पुरातन मंदिरे पर्यटकांना भुरळ घालतात. 


उकळत्या पाण्याचे कुंड 
अहेरी तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) येथे उकळत्या पाण्याचे कुंड येथील खास आकर्षण आहे. हा परिसर अतिदुर्गम असल्याने पर्यटकांची संख्या कमी आहे. विकासही खुंटलेला आहे.


ग्लोरी ऑफ फॉरेस्ट 
आलापल्ली वनविभागात आलापल्ली भामरागड मार्गावरील तलवाडा गावापासून जंगलात दक्षिण दिशेकडे ७ किमी अंतरावर ग्लोरी ऑफ फॉरेस्ट आहे. वनवैभव अनुभवण्यासाठी यासारखे दुसरे स्थळ नाही.


टिप्पागड पहाडी
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कोरची तालुक्यात असलेल्या टिप्पागड पहाडी डी हे हे धार्मिक व नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे. येथील डोंगररांगेवर असलेला तलाव प्रेक्षणीय आहे. हे स्थळ पर्यटकांचे आकर्षण आहे.


वडदमचे जीवाश्म पार्क 
सिरोंचा तालुक्याच्या वडदम येथे डायनासोरचे जीवाश्म आढळले होते. हे जीवाश्म पाहता यावे, यासाठी वनविभागाने येथे पार्कची निर्मिती केली. येथे अनेक पर्यटक वर्षभर भेटी देत असतात.


बिनागुंडा धबधबा 
भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात गावापासून घनदाट जंगलात धबधबा आहे. येथील पहाडीवरून वर्षभर पाणी खाली कोसळत असते. येथेसुद्धा पर्यटक भेटी देतात.


कमलापूरचा हत्ती कॅम्प 
अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथे येथे राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. येथे प्रशिक्षित हत्ती असून, त्यांचा वापर जंगलातील लाकडाची ने-आण करण्यासाठी केला जातो. सध्या येथे आठ हत्ती आहेत.

Web Title: World Tourism Day: Have you visited these tourist spots in Gadchiroli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.