विस्मृतीत गेले विसोरात रंगलेले कुस्तीचे डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:11 AM2019-08-29T00:11:08+5:302019-08-29T00:11:58+5:30
कुस्ती म्हणजे स्वत:मधली कठोर शारीरिक संपदा व हजरजबाबी बौद्धिकता अशा दुहेरी डावपेचांच्या बळावर आखाडारुपी मैदानात अजिंक्य राहण्याचा खेळ. कुस्ती खेळण्यासाठी निडरता, अचूक पण लक्षवेधी निर्णयक्षमता, पिळदार अंग, प्रचंड मेहनत आणि जिंकण्याची लालसा असणे आवश्यक आहे.
अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा/तुळशी : ५० वर्षांपूर्वी विसोरा गावात तीन व तुळशी येथे दोन मातीचे कुस्ती आखाडे होते. या आखाड्यात बालगोपाल, तरूण तसेच पौढ मंडळी दररोज सकाळी व सायंकाळी कुस्ती खेळायचे. विसोरा परिसरात त्याकाळी कुस्तीची चांगली क्रेज होती. या परिसरातील मातीने शेकडो कुस्तीपटू येथे जन्माला घातले. मात्र काळानुरूप ५० वर्षांपूर्वीच कुस्ती आखाडे बंद झाले. त्यामुळे आता केवळ आठवणी उरल्या आहेत.
कुस्ती म्हणजे स्वत:मधली कठोर शारीरिक संपदा व हजरजबाबी बौद्धिकता अशा दुहेरी डावपेचांच्या बळावर आखाडारुपी मैदानात अजिंक्य राहण्याचा खेळ. कुस्ती खेळण्यासाठी निडरता, अचूक पण लक्षवेधी निर्णयक्षमता, पिळदार अंग, प्रचंड मेहनत आणि जिंकण्याची लालसा असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या मातीतला मुरलेला अस्सल असा खेळ म्हणजे कुस्ती. आजच्या चार-पाच दशकांपूर्वी इथल्या माणसामाणसांत रुळलेला आणि प्रत्येकाला आकर्षित करणारा खेळ म्हणजे कुस्ती. या कुस्तीचा लळा विसोरावासियांना सुद्धा जडला होता. म्हणूनच ज्याकाळी आजच्यासारख्या कसल्याही सोईसुविधा नसताना एकट्या विसोरा गावात तीन आणि तुळशी येथे दोन मातीचे आखाडे होते. येथे कुस्ती खेळण्यासाठी गर्दी होत होती. सण, उत्सव तसेच विशेषदिनी कुस्तीची दंगल रंगायची. विसाव्या शतकाच्या सत्तर-ऐंशीच्या दशकापर्यंत कुस्तीचा विसोरात आणि परिसरात जणू माहौल होता. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्य विसोरा, तुळशी येथील कुस्तीगीरांशी चर्चा करून कुस्ती व आखाड्याच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.
विसोरा येथील प्रतिष्ठीत नागरिक उरकुडा बगमारे यांनी विसोरा येथे कुस्तीचे आखाडे तयार करून कुस्ती खेळाला चालना दिल्याचे जाणकार सांगतात. बाबुराव बोरूले यांच्या घराजवळ असलेल्या विहीरीच्या जागेवर सर्वांत प्रथम कुस्ती आखाडा तयार केला गेला. दुसरा आखाडा जुन्या ग्रामपंचायतच्या जागेवर व तिसरा आखाडा विसोरा प्रवासी निवाऱ्याच्या समोरील एका घरात. तुळशी येथेही दोन आखाडे होते.
आखाडा म्हणजे जमिनीत दीड-दोन फूट खोल गोलाकार खड्डा खोदून त्यात मऊ गाळलेली माती, मातीवर एक-दोन बंडी लिंबू टाकले जात असे. हे मिश्रण एकत्र करून मूरलेल्या मातीवर कुस्तीचा डाव खेळवल्या जात असे. मातीत लिंबू टाकल्यामुळे कुस्ती खेळतांना माती डोळ्यात गेली तरी डोळ्याला कसलीही इजा होत नसे. कुस्तीत जखम भरण्यासाठी हीच माती जखमेवर चोळत.
कुस्ती खेळणारे कुस्तीगीर शरीर मजबूत आणि लवचिक करण्यासाठी पहाटे ४ वाजता उठून धावण्याचा सराव करीत, पोहणे. आखाड्यात दंडबैठका मारणे, हाते, मूतगल वापरून कठीण व्यायाम करणे तसेच सरसू तेलाने मालिश केली जात असे.
वर्षातील गुरूपौर्णिमा, पोळा, सर्वपीत्री अमावस्या, मकर बैल अशा विशेष दिनी किंवा भर पावसाचे दिवस वगळता विसोराच्या आखाड्यात कुस्तीचा डाव चालायचा. तसेच विसोरा, पोटगाव, वीर्शी (वडसा) येथे मोकळ्या जागेत मोठी दंगल असायची. यावेळी कुस्ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील क्रिडाप्रेमी आवर्जून गर्दी करत. या कुस्तीच्या दंगलमध्ये विजयी पैलवानाला बक्षीस म्हणून एक ते दीड रुपया किंवा एक नारळ किंवा टोपी देऊन गौरविण्यात येत असे. तिकीट ठेवून सुद्धा कुस्ती दंगल आयोजित होत असे. पोळा सनानंतरच्या मारबतीच्या दिवशी गाढवी नदी किनारी मातीवर कुस्तीचा डाव रंगायचा.
कुस्तीच्या उत्कर्षाकरिता विसोरातील अनेक मान्यवरांनी हातभार लावला. यातूनच कुस्तीगीर उदयास आले. कुस्तीगीर म्हणून विसोराचे संभा अवसरे, रामदास नेवारे, उरकुडा बगमारे, जंगलू कुकडे, लक्ष्मण नेवारे, श्रीराम नेवारे, किसन मेश्राम, डेडु मेश्राम, कवडु मेश्राम, अंताराम अवसरे, वासुदेव नेवारे, हरी नेवारे, वासुदेव वघारे, महादेव तोंडरे, दोंडकु तोंडरे, धर्मा बगमारे, केशव नाकाडे, होमचंद्र मेश्राम, मारोती बेहरे, दयाराम बुराडे, केशव नाकाडे, महादेव नाकाडे, हरी नेवारे, लाला सूर्यवंशी, डोमा बुराडे, रामा नेवारे गुरुजी, किसन नाकाडे, धोंडू मारभते, रघू नेवारे, सीताराम दूधकूवर, बगमारे, डोमा बुद्धे, बाबुराव बोरूले आणि तुळशीचे गणपत ठाकरे, यांचे नाव आजही आवर्जून घेतले जाते. मात्र ५० वर्षांपूर्वी विसोरा परिसरात कुस्तीला प्राप्त झालेले वैभव आज पुन्हा परत येणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
शाळा, महाविद्यालयस्तरावर अनास्था
आजच्या स्थितीत गावखेड्यातील कुस्ती वा इतर अनेक खेळांकडे पाहण्याचा आणि खेळण्याचा दृष्टिकोन पार बदलून गेला आहे. परंतु एकही खेळ योग्यपणे खेळल्या जात नाही. आजही परिसरात अनुभवी कुस्तीगीर आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रेरणेने आणि प्रशिक्षणाने अनेक कुस्तीगीर तयार करता येऊ शकतात. त्यासाठी शासन, प्रशासन आणि जनतेने पुढाकार घेण्याची गरज आहे. शालेय क्रीडा स्पर्धेत सुद्धा कुस्ती खेळ समाविष्ट असूनही शाळा, महाविद्यालयात कुस्तीबाबत अनास्था अधिक दिसून येते.
‘त्या’ कुस्तीपटूची कथा देते स्मृतिंना उजाळा
कुस्तीचा विषय काढताच जुन्या जाणत्या लोकांच्या तोंडातून आपसूकच बाहेर पडणारे पहिले नाव म्हणजे जंगलू पहेलवान ऊर्फ जंगलू कुकडे यांचे. तसेच कुस्तीगीर लक्ष्मण नेवारे आपल्या उभ्या आयुष्यात खेळलेल्या कुस्तीच्या खेळांत कधीच पडले नाही, अशी माहिती मिळाली. सर्वात विशेष म्हणजे, लक्ष्मण नेवारे लाकडी बैलबंडी (बैलगाडी) अगदी सहज आपल्या डोक्यावर उचलत. एकदा पाठीवर उचलून मांडलेले धानाचे पोता कुठेही न थांबता पाचशे मीटरवर घेऊन जात असे गावकरी सांगतात.