तंत्रज्ञाअभावी एक्स-रे मशीन बंद
By admin | Published: March 11, 2017 01:39 AM2017-03-11T01:39:37+5:302017-03-11T01:39:37+5:30
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात लाखो रूपये खर्चून एक्स-रे मशीन लावण्यात आली आहे.
देसाईगंज रुग्णालयातील स्थिती : सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड
देसाईगंज : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात लाखो रूपये खर्चून एक्स-रे मशीन लावण्यात आली आहे. मात्र सदर मशीन हाताळण्यासाठी तंत्रज्ञ नसल्याने ही एक्स-रे मशीन महिन्यातून बहुतांश दिवस बंदच राहते. परिणामी सदर मशीन केवळ शोभा वाढविणारीच वस्तू बनली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मात्र एक्स-रे साठी खासगी रुग्णालयात जाऊन पैसे मोजावे लागतात. त्यामुळे रुग्ण कमालीचे त्रस्त आहेत.
देसाईगंज येथे ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. या रुग्णालयात ५० बेडची सुविधा उपलब्ध झाली आहे. देसाईगंज ते गडचिरोलीचे अंतर ५० किमी असल्याने तालुक्यातील बहुतांश रुग्णांना सर्वप्रथम देसाईगंज येथीलच ग्रामीण रुग्णालयात भरती केले जाते. त्यानंतर स्थितीनुसार त्याला गडचिरोली किंवा नागपूर रुग्णालयात हलविले जाते. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हाड तुटण्याचे प्रकारही वाढले आहेत. गरीब व्यक्ती खासगी रुग्णालयात जाऊन एक्स-रे काढू शकत नाही. नामधारी खर्चात त्याला एक्स-रे काढून मिळावे यासाठी ग्रामीण रुग्णालयात लाखो रूपये खर्चुन एक्स-रे मशीन लावण्यात आली; मात्र या मशीनला चालविणारे तंत्रज्ञ आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे एक्स-रे काढण्याचे काम जवळपास बंद आहे. परिणामी नागरिकांना ब्रह्मपुरी किंवा गडचिरोली येथे जावे लागत आहे. सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त इमारत शासनाने बांधून दिली असली तरी या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार आहे व रुग्णांनाही वेळेवर सेवा मिळत नाही. त्यामुळे रुग्ण व कर्मचारीही त्रस्त आहेत. लाखो रूपयांची मशीन शासनाने खरेदी केली आहे. या मशीनचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांसाठी व्हावा, यासाठी एक कायमस्वरूपी तंत्रज्ञ नेमणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडे अनेकवेळा निवेदन पाठविण्यात आले. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
ग्रामीण रुग्णालयात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधीक्षकाचे एक पद मंजूर असून ते रिक्त आहे. सद्य:स्थितीत तीन डॉक्टर आहेत. यापैकी दोन डॉक्टरांनी याच महिन्यात त्यांच्या पदाचा राजीनामा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच ही दोन पदे रिक्त होणार आहेत. याशिवाय एक्स-रे तंत्रज्ञ, औषध निर्मात्याची पदे रिक्त आहेत. स्टाप नर्सची दोन पदे रिक्त आहेत.