यावर्षी जिल्ह्यात हिवतापाची साथ नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:38 PM2019-04-23T23:38:44+5:302019-04-23T23:39:53+5:30
गेल्या सात-आठ वर्षाच्या तुलनेत आता गडचिरोली जिल्ह्यातील हिवताप रोग नियंत्रणात आहे. हिवतापाचे रूग्ण वाढू नयेत, यासाठी हिवताप विभागातर्फे येत्या पावसाळ्यात विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या सात-आठ वर्षाच्या तुलनेत आता गडचिरोली जिल्ह्यातील हिवताप रोग नियंत्रणात आहे. हिवतापाचे रूग्ण वाढू नयेत, यासाठी हिवताप विभागातर्फे येत्या पावसाळ्यात विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. मलेरिया नियंत्रणासाठी जिल्ह्याच्या हिवतापाबाबत अतिसंवेदनशील १ हजार ३१५ गावात डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येणार आहे. तसेच उपलब्ध झालेल्या ७२ हजार मच्छरदाण्या वितरित करण्यात येणार असून मलेरिया नियंत्रणासाठी विभाग दक्ष आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्या समवेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संजय समर्थ उपस्थित होते.
मागील वर्षी पावसाळ्यात ६६ कंत्राटी आरोग्य सेवकांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्यामार्फत हिवताप नियंत्रणाचे कार्य करण्यात आले. हिवतापाचा उद्रेक वाढू नये, यासाठी शासनाच्या मार्गदर्शनानुसार आपण मान्सूनपूर्व नियोजन केले आहे. हिवतापाबाबत संवेदनशील असलेल्या जिल्ह्यातील १ हजार ३१५ गावांमध्ये जून महिन्यापासून मलेरिया प्रतिबंधात्मक फवारणी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी फवारणी कामगारांच्या ४० चमू कार्यरत राहणार आहे. यामध्ये प्रत्येक चमूत सहा कर्मचाऱ्यांचा समावेश राहिल. याशिवाय रक्त नमुने तपासणाºया तंत्रज्ञाचे रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. कुणाल मोडक यांनी यावेळी दिली. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांना मच्छरदाण्यांचा पुरवठा करण्यात आला. या मच्छरदाण्यांचा योग्य उपयोग होत आहे काय? त्याचे परिणाम काय? याबाबत यंदा आढावा घेण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या शहरी भागात हिवतापाचे डास नाहीत. मात्र जंगलालगतच्या गाव परिसरात हिवतापाचे डास आढळून येतात. गडचिरोलीसह काही शहरी भागातील डासांची चाचणी केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे, असे डॉ. मोडक यांनी सांगितले.
सव्वादोन वर्षात नऊ जणांचा बळी
सन २०१७-१८ ते मार्च २०१९ या सव्वादोन वर्षाच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाने बाधित नऊ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २०१७ वर्षात पाच, २०१८ मध्ये तीन व २०१९ च्या जानेवारी महिन्यात एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. २०१७ मध्ये एकूण ५ लाख ९८ हजार १६० लोकांचे रक्त नमुने घेण्यात आले. यापैकी ५ हजार ४८४ रूग्ण हिवताप बाधित आढळून आले. यामध्ये पीव्ही स्वरूपाचे ९३४ व पीएफ स्वरूपाच्या ४ हजार ४५० रूग्णांचा समावेश आहे. २०१८ मध्ये ५ लाख ५९ हजार २९६ लोकांचे रक्त नमुने घेण्यात आले. यापैकी २ हजार ५८४ हिवताप बाधित रूग्ण आढळून आले. चालू वर्षात २०१९ मध्ये मार्चपर्यंत १ लाख १२ हजार ४९१ लोकांचे रक्तनमुने घेण्यात आले. यापैकी २१० रूग्ण हिवताप बाधित आढळून आले.