यावर्षी मलेरिया नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 11:43 PM2018-10-20T23:43:11+5:302018-10-20T23:44:11+5:30
प्रशासनाने केलेले प्रयत्न व निसर्गाने दिलेली साथ यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत मलेरिया (हिवताप) नियंत्रणात असल्याचे दिसून येते. तरीही जुलै महिन्यात दोन नागरिकांना मलेरियामुळे जीव गमवावा लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रशासनाने केलेले प्रयत्न व निसर्गाने दिलेली साथ यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत मलेरिया (हिवताप) नियंत्रणात असल्याचे दिसून येते. तरीही जुलै महिन्यात दोन नागरिकांना मलेरियामुळे जीव गमवावा लागला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती व वातावरण मलेरियासाठी पोषक आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मलेरियाचा उद्रेक होते. राज्यात सर्वाधिक रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळत असल्याने मलेरियाबाबत गडचिरोली जिल्हा अतिशय संवेदनशील समजल्या जाते. मलेरियाचा प्रकोप वाढू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कधीकधी निसर्ग साथ देत नाही. वातावरण मलेरिया रोगासाठी पोषक बनते. त्यामुळे मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते.
गडचिरोली जिल्ह्यात पर्जन्यमान अधिक आहे. बहुतांश गावे जंगलात वसली आहेत. तसेच धानाची शेती केली जात असल्याने गावाच्या सभोवताल असलेल्या धानाच्या बांधीत पाणी साचून राहते. याच पाण्यात डासांची पैदास वाढते. परिणामी मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सुमारे ५ हजार ४८४ रुग्ण आढळले होते. यावर्षी मात्र त्या तुलनेत रुग्णांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी असल्याचे दिसून येते. जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यापर्यंत केवळ १ हजार ९७७ रुग्ण आढळून आले आहेत. यावरून मागील वर्षीच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी असून मलेरिया नियंत्रणात असल्याचे दिसून येते.
प्रशासनाने केलेल्या उपाययोजना
ग्रामीण व दुर्गम भागात प्रामुख्याने मलेरियाचे रुग्ण अधिक आढळतात. मलेरियापासून बचाव करण्यासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे हा सर्वोत्तम उपाय असल्याने हिवताप कार्यालयातर्फे नागरिकांना औषधभारीत मच्छरदाण्या मोफत वितरित करण्यात आल्या. झोपताना मच्छरदाणीचा अवश्य वापर करावा, याबाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली. त्याचबरोबर घराच्या सभोवताल पाणी जमा होऊ देऊ नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावातील आशाकडे औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे थंडीवाजून ताप आल्याबरोबर नागरिक आशाकडे जाऊन औषधोपचार करून घेतात. हंगामी क्षेत्र कर्मचारी नेमून त्यांच्या मार्फत घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले. रक्त नमूने गोळा करण्यात आले. एवढेच नव्हे तर संबंधित रुग्णाला स्वत:च्या निगराणीत औषध देत होते. त्यामुळे यावर्षी मलेरिया नियंत्रणात आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी दिली आहे.