यंदा शिंगाड्याचे उत्पादन वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 11:36 PM2018-11-10T23:36:50+5:302018-11-10T23:42:26+5:30
फळवर्गीय पिकात अत्यंत रूचकर व पौष्टिक फळ असणाऱ्या शिंगाड्याची शेती आता कृषीपूरक व्यवसाय ठरत आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, अरसोडा व देसाईगंज तालुक्याच्या चोप (कोरेगाव) येथील कहार व ढिवर समाजबांधव शिंगाड्याची शेती मोठ्या प्रमाणात करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : फळवर्गीय पिकात अत्यंत रूचकर व पौष्टिक फळ असणाऱ्या शिंगाड्याची शेती आता कृषीपूरक व्यवसाय ठरत आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, अरसोडा व देसाईगंज तालुक्याच्या चोप (कोरेगाव) येथील कहार व ढिवर समाजबांधव शिंगाड्याची शेती मोठ्या प्रमाणात करीत आहेत. वैरागड भागासह देसाईगंज तालुक्यात यंदा शिंगाड्याचे उत्पादन वाढले आहे.
आरमोरी तालुक्यातील वैरागड हे गाव सीताफळ व शिंगाडा फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. सध्यास्थितीत सीताफळाच्या गावाशेजारी असणाºया बागा नष्ट झाल्या असल्या तरी आजही वैरागड येथे काहार समाज बांधव माराई बोडी, महादेव तलाव, जोडतलाव व इतर लहान-मोठ्या तलावात शिंगाड्याचे उत्पादन घेत आहेत.
जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली व इतर तालुक्याच्या ठिकाणच्या बाजारपेठेत तसेच आठवडी बाजारात शिंगाड्याची विक्री करून हे समाजबांधव उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र शासनाकडून या शेतीला कोणतेही संरक्षण वा सोयीसवलती देण्यात आल्या नसल्याने शिंगाडे उत्पादकांना प्रसंगी तोटाही सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यातील धान उत्पादकांना तसेच रेशीम शेती उद्योगासाठी शासनाकडून ज्या सवलती मिळतातच त्याच धर्तीवर शिंगाडे उत्पादकांना सोयसवलती देण्यात याव्या, अशी मागणी वैरागड येथील दामोधर भरद्वार, राजू भरद्वार व इतर शिंगाडे उत्पादकांनी केली आहे.
कृषी विभागाच्या वतीने शिंगाडे उत्पादनाची शेती व्यापक प्रमाणात होण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलावी, अशीही मागणी होत आहे. सध्या गडचिरोलीसह शहराच्या बाजारपेठेत शिंगाडे फळाला मोठी मागणी दिसून येत आहे.
शिंगाड्याची शेती करण्यासाठी तलावात वेल टाकण्यापासून ते बाजारातील ग्राहकापर्यंत आपला उत्पादित माल पोहोचविण्यासाठी अनेक धोके पत्कारावे लागतात. पावसाळ्यापूर्वी तलावात वेल टाकले जात असल्याने अनेकदा ते पुरात वाहून जातात. शिंगाडे पिकावर किडा, टकोराचा प्रादुर्भाव होत असतो. हे पाण्यात होणारे पीक असल्याने अनेक अडचणी येतात. तसेच धोकेही असतात. त्यामुळे शासनाने शिंगाडे शेतीला सोयीसवतली व संरक्षण द्यावे, अशी शिंगाडे उत्पादकांची मागणी आहे.
- दामोधर भरद्वार, शेतकरी, वैरागड