यावर्षी शाळकरी मुलींना सायकलींचे वाटपच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:26 AM2019-01-31T01:26:36+5:302019-01-31T01:27:21+5:30
मानव विकास मिशनअंतर्गत जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील गावापासून शाळेपर्यंत अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप केले जाते. या योजनेंतर्गत शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मानव विकास मिशनअंतर्गत जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील गावापासून शाळेपर्यंत अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप केले जाते. या योजनेंतर्गत शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला. मात्र तीन महिने उलटूनही सदर प्रस्तावावर कार्यवाही झाली नाही. या योजनेसाठी निधीच मंजूर न केल्याने शालेय सत्र अंतिम टप्प्यात असताना दोन हजारांवर विद्यार्थिनी सायकलच्या प्रतिक्षेत आहेत.
जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील शेकडो माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. विद्यार्थी रहिवासी असलेल्या गावात शाळा नसल्याने गावातील अनेक विद्यार्थी पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील दुसºया गावातील शाळांमध्ये शिक्षणासाठी जातात. ज्या विद्यार्थ्यांना मानव विकास मिशनची बस सुविधा मिळू शकत नाही, अशा विद्यार्थिनींना मोफत सायकल उपलब्ध करून दिली जाते. गेल्या तीन ते चार वर्षात सातत्याने अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना सायकलीचा लाभ देण्यात आला. मात्र यंदा शालेय सत्राचे सहामाही सत्र संपूनही सायकल वाटपाची कार्यवाही हाती घेण्यात आली नाही.
मानव विकास मिशनचा निधी प्राप्त झाल्यानंतर हा निधी शिक्षण विभागातर्फे संबंधित शाळांच्या खात्यात वळविला जातो. यासाठी शिक्षण विभागाने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानंतर प्राप्त प्रस्तावाबाबत नियोजन आराखडा ठरवून परिपूर्ण प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर करण्यात आला. परंतू निधीअभावी त्या प्रस्तावाला मंजुरीच मिळाली नसल्याची माहिती आहे.
विद्यार्थिनींना सायकल वाटप योजनेबाबतचा प्रस्ताव मानव विकास मिशनच्या कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही आर्थिक तरतूद करून या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली नाही. यासंदर्भात महिनाभरापूर्वी नियोजन विभागाकडे विचारणाही केली होती.
- रमेश उचे, शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.गडचिरोली
एक कोटी रुपयांचा खर्च
शिक्षणासाठी दररोज दुसऱ्या गावी जाणाऱ्या जवळपास तीन हजार विद्यार्थिनींना सायकली वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. यासाठी जवळपास एक कोटी रुपये लागणार आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता एका सायकलमागे ५०० रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी तीन हजार रुपयांचे अनुदान एका विद्यार्थ्याला मिळत होते. आता प्रतीविद्यार्थी ३ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. मात्र यासाठीचा प्रस्ताव मानव विकास मिशनच्या नियोजन विभागाने अद्यापही मंजूर केला नसल्याने विद्यार्थिनींची शाळेपर्यंतच्या प्रवासाची पायपीट सुरूच आहे. हे सत्र संपण्यासाठी अवघे २ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यंदाच्या सत्रात विद्यार्थिनींना सायकली मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.