यंदा पीक कर्जाचे लक्ष्यांक वाढले
By admin | Published: May 30, 2014 12:04 AM2014-05-30T00:04:07+5:302014-05-30T00:04:07+5:30
कृषी विभागाने खरीप व रबी हंगामातील लागवडीसाठी शेतकर्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यावर्षी २0१४-१५ या वर्षात सर्व बँकांना मिळून एकूण १२४ कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.
दिलीप दहेलकर - गडचिरोली
कृषी विभागाने खरीप व रबी हंगामातील लागवडीसाठी शेतकर्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यावर्षी २0१४-१५ या वर्षात सर्व बँकांना मिळून एकूण १२४ कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. गत दोन-तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी पीक कर्जाच्या वाटपाच्या उद्दिष्टात वाढ झाली असल्याचे दिसून येते.
गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना खरीप हंगामासाठी ५ हजार २७३ लाख व रबी हंगामासाठी ५00 लाख असे एकूण ५ हजार ७७३ लाख रूपये कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ हजार ४४२ व रबी हंगामासाठी ७६0 लाख असे एकूण ५ हजार २0२ लाख रूपये कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण बँकांना खरीप हंगामासाठी १ हजार २६५ लाख तर रबी हंगामासाठी १६५ लाख असे एकूण १ हजार ४३0 लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
आदिवासीबहुल, मागास व उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे वर्षभराचे आर्थिक बजेट शेती उत्पादनावर अवलंबून असते. यामुळे जिल्ह्यातील कृषी विकासाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी जिल्ह्याचा कृषी विभाग प्रयत्नशील आहे. यामुळे यंदा जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने पीक कर्जाच्या उद्दिष्टात वाढ केली असून बँकांना शेतकर्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सुचनाही केल्या आहेत.
गतवर्षी २0१३-१४ च्या खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत, मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांना मिळून ९ हजार ९८0 लाख रूपयाचे पीक कर्ज वितरित केले. रबी हंगामासाठी या सर्व बँका मिळून गतवर्षी १ हजार २९७ लाख रूपयाचे कर्ज वितरित केले. जिल्ह्यातील २९ हजार २८४ क्रेडिटधारक शेतकर्यांनी पीक कर्जाचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात वनपट्टे वाटप झाल्यामुळे शेतकर्यांची संख्याही वाढली आहे. त्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. होत असलेल्या कर्ज वाटपातून या शेतकर्यांनी खरीप व रबी पिकाची लागवड करून गेल्या काही वर्षात उत्पादन घेतले आहे. पीककर्ज उपलब्ध होऊन सहकारातून कृषी विकास काही प्रमाणात होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)