यावर्षीही शिक्षकांना आदर्श पुरस्काराची हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:34 AM2021-08-29T04:34:59+5:302021-08-29T04:34:59+5:30
भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णण यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना ...
भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णण यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. देश, राज्य व जिल्हा स्तरावरही पुरस्कार दिले जातात. यावर्षी देशपातळीवरील पुरस्कार जाहीर झाले आहेत. मात्र राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्याबाबत काहीच नियाेजन नाही. यावरून हे दाेन्ही पुरस्कार यावर्षीही दिले जाणार नाहीत, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
राज्यस्तरीय पुरस्काराची निवड प्रक्रिया जवळपास तीन महिने चालते. यात वेगवेगळे टप्पे राहतात. तर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर जिल्हास्तरीय समिती निर्णय घेऊन शिक्षकांची निवड करते. यावर्षी मात्र ही प्रक्रिया ठप्प आहे. शिक्षकांकडून अर्जच मागविण्यात आले नाहीत.
बाॅक्स
केंद्राचा पुढाकार तर राज्य मागे का?
काेराेनाचे संकट असतानाही केंद्र शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज मागून ते जाहीरही केले आहेत. केंद्र शासनाने पुरस्कार जाहीर केले तर राज्याला काय अडचण आहे. असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला जात आहे. केद्र शासनाप्रमाणेच राज्यालाही ऑनलाइन पद्धतीने पुरस्काराचे वितरण करणे शक्य झाले असते.
बाॅक्स
काेराेनाकाळात नावीन्याचा शाेध
काेराेनामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. शाळा बंद असतानाही अध्यापन व अध्ययन प्रक्रिया सुरू राहील यासाठी काही शिक्षकांनी अनेक संशाेधन केले आहे. नवनवीन ऑनलाइन साधने शिक्षकांनी शाेधून काढली. आदर्श शिक्षक पुरस्काराच्या माध्यमातून अशा शिक्षकांचा शाेध घेणे शक्य झाले असते. काेराेनाकाळातही काही शिक्षकांनी अतिशय मेहनत घेतली आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान झाल्याने त्यांचा उत्साह वाढला असता.