यावर्षीही पाऊस कमीच पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:55 PM2018-09-30T23:55:03+5:302018-09-30T23:55:24+5:30
पावसाळ्याच्या सुरूवातीला पडलेल्या पावसावरून यावर्षी पाऊस वार्षिक सरासरी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र यावर्षीही सरासरीच्या दोन टक्के पाऊस कमी झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पावसाळ्याच्या सुरूवातीला पडलेल्या पावसावरून यावर्षी पाऊस वार्षिक सरासरी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र यावर्षीही सरासरीच्या दोन टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यातही काही तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी ९० टक्केपेक्षा कमी आहे.
१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीतील पावसाचे प्रमाण हवामान खात्यामार्फत मोजले जाते. याच कालावधीला पावसाळा संबोधल्या जाते. गडचिरोली जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीपर्यंत सरासरी १३४७.७ एवढा सरासरी पाऊस पडतो. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपीक करपले होते. एवढेच नाही तर उशीरा पाऊस पडल्याने रोवणी सुध्दा लांबली होती. याचा मोठा परिणाम धान पिकावर झाला होता. यावर्षी मात्र अगदी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडला. आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे यावर्षीचा पाऊस वार्षिक सरासरी गाठेल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाने कायमची उसंत घेतली. आठ दिवसांपूर्वी झालेला पाऊस वगळता, संपूर्ण सप्टेंबर महिना कोरडा गेला. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरूवातीला नागरिक व हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खोटा ठरत पावसाने सरासरी तर गाठलीच नाही. उलट वार्षिक सरासरीच्या दोन टक्के पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यात केवळ १३२८.३ टक्के एवढाच पाऊस पडला आहे.
मागील एक महिन्यापासून पावसाने उसंत घेतली आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांधीतील पाणी आटले आहे. ज्या शेतकºयांजवळ सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत, असे शेतकरी धान पिकाला पाणी देत आहेत. मात्र ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकºयांना स्वत:चे धान करपतेवेळी बघावे लागत आहे.
आॅगस्ट महिन्यापर्यंत दिवसरात्र पाऊस पडत होता. त्यामुळे कापूस, तूर, सोयाबिन या पिकांची वाढ खुंटली होती. कापूस पिकाला आता बोंड येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र पावसाने दगा दिल्याने कापूस पीक सुध्दा कोमेजायला लागले आहे. परिणामी कापसाच्या उत्पादनातही कमालीची घट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
सात तालुक्यांमध्ये ९० टक्केपेक्षा कमी पाऊस
यावर्षी जिल्हाभरात पावसाचे प्रमाण अतिशय व्यस्त आहे. काही तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस पडला आहे. तर काही तालुक्यांमध्ये मात्र ९० टक्केपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. गडचिरोली तालुक्यात सरासरीच्या ८४.९ टक्के, धानोरा तालुक्यात ८३.५ टक्के, देसाईगंज तालुक्यात ८९.८ टक्के, आरमोरी तालुक्यात ८२.५ टक्के, कुरखेडा तालुक्यात ७७.६ टक्के, कोरची तालुक्यात ७७.४ टक्के झाला आहे.
सप्टेंबर महिन्यात सरासरी २१७.४ मिमी एवढा पाऊस पडणे अपेक्षित होता. मात्र यावर्षी केवळ १०६.७ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पडणाºया वार्षिक सरासरीच्या केवळ ४९.१ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात कमी पडलेल्या पावसामुळे यावर्षी पाऊस वार्षिक सरासरी सुध्दा ओलांडू शकला नाही.