यंदा विवाह साेहळे झाले शाॅर्टकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 05:00 AM2020-11-25T05:00:00+5:302020-11-25T05:00:37+5:30
२०० ते ३०० किंवा जास्तीत जास्त ४०० लाेकांच्या उपस्थितीत यावर्षी विवाह कार्य पार पाडण्यावर कुटुंबिय भर देणार आहेत. दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात एका मंगल कार्यालयाकडे २० ते २५ लग्न कार्यालयाच्या बुकींग राहत हाेत्या. मात्र यावर्षी त्याची संख्या निम्म्याच्या खाली आहे. लग्न कार्य म्हटले की, बॅन्ड, संदल, फेटे, घाेडा आदीसह विविध प्रकारचा तामझाम राहत असताे. सधन लाेक विवाह कार्यावर लाखाे रुपये खर्च करतात.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेना महामारीने शासकीय नाेकरदार वगळता इतर बहुतांश कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात काेराेना संसर्गाच्या भीतीमुळे जुळलेले उपवर-वधूचे विवाह साेहळे कमी लाेकांच्या उपस्थितीत शाॅर्ट बट स्विट पद्धतीने पार पडणार आहेत. तशी माहिती मंगल कार्यालयाचे संचालक व वर-वधू कुटुंबांच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
२०० ते ३०० किंवा जास्तीत जास्त ४०० लाेकांच्या उपस्थितीत यावर्षी विवाह कार्य पार पाडण्यावर कुटुंबिय भर देणार आहेत. दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात एका मंगल कार्यालयाकडे २० ते २५ लग्न कार्यालयाच्या बुकींग राहत हाेत्या. मात्र यावर्षी त्याची संख्या निम्म्याच्या खाली आहे.
लग्न कार्य म्हटले की, बॅन्ड, संदल, फेटे, घाेडा आदीसह विविध प्रकारचा तामझाम राहत असताे. सधन लाेक विवाह कार्यावर लाखाे रुपये खर्च करतात. आपल्या आर्थिक ऐपतीनुसार प्रत्येकजण लग्न साेहळे पार पाड पाडताे. मात्र यावर्षी काेराेना संसर्गामुळे श्रीमंत, गरीब, सामान्य व सर्वच कुटुंबांसाठी विवाह साेहळे मर्यादित स्वरूपाचे झाले आहेत. काेराेनामुळे या कार्यातील अनेकांचा राेजगार हिरावला आहे.
तुळशी विवाहानंतर बार उडणार
७ डिसेंबरपासून तुळशी विवाहास प्रारंभ हाेत आहे. साधारणत: तुळशी विवाहानंतरच उपवर-वधूवरांचे विवाह कार्य संपन्न करण्यावर कुटुंबिय भर देतात. नाेव्हेंबर महिन्यात फारसे विवाह साेहळे पार पडणार नाहीत. मात्र (तुळशी विवाह) डिसेंबर महिन्यापासून लग्न कार्याला वेग येणार आहे. मर्यादित लाेकांच्या उपस्थितीत लग्न साेहळे पार पडणार आहेत.
एप्रिल, मे मध्ये सर्वाधिक मुहूर्त
सन २०२१ मध्ये नवीन वर्षात विवाहासाठीचे सर्वाधिक मुहूर्त एप्रिल व मे महिन्यात आहे. एप्रिल महिन्यातील विवाहासाठी मुहूर्ताच्या तारखा २२, २४, २६, २७, २८, २९, ३० अशा आहेत. एप्रिल महिन्यात सात तारखा आहेत. मे महिन्यात १६ मुहूर्त आहेत. यामध्ये १, २, ७, ८, ९, १३, १४, २१, २२, २३, २४, २६, २८, २९, ३० या तारखा आहेत. मे महिन्यात विवाह साेहळ्याचा हंगाम जाेमात राहणार आहे. अनेक जाेडपी याच महिन्यात विवाह करतात.
काेराेना महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रम व लग्न समारंभावर बंदी आली. परिणामी मार्चपासून ऑक्टाेबरपर्यंत आम्हा व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. आता अनलाॅक झाल्यापासून शासनाने लग्न समारंभ व कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. मात्र दरवर्षीपेक्षा यंदा निम्म्याच्या खाली मंगल कार्यालयासाठी बुकींग झाली आहे. काेराेना संसर्गाबाबत मंगल कार्यालयात सॅनिटायझर, मास्कचा वापर करून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. यावर्षी काेराेनामुळे बरेच लाेक मंगल कार्यालयांमध्ये सवलत मागत आहेत. व्यवसाय घसरला आहे.
-सुनील पाेरेड्डीवार, सभागृह व मंगल कार्यालय, संचालक, गडचिराेली