तरुण उमेदवारांचा रिंगणात बोलबाला
By admin | Published: October 28, 2015 01:43 AM2015-10-28T01:43:18+5:302015-10-28T01:43:18+5:30
विधानसभा, लोकसभा निवडणुकीत स्थानिक स्तरावरील प्रचाराची धुरा सांभाळणारे लोकप्रतिनिधी आता थेट नगर पंचायतीची निवडणूक लढवित आहेत.
भामरागड नगर पंचायत : मतदार नव्या चेहऱ्याच्या शोधात
भामरागड : विधानसभा, लोकसभा निवडणुकीत स्थानिक स्तरावरील प्रचाराची धुरा सांभाळणारे लोकप्रतिनिधी आता थेट नगर पंचायतीची निवडणूक लढवित आहेत. अनेक वर्षांपासून राजकारणात राहूनही जनतेची कामे न करता स्वत:भोवती वलय निर्माण करणारे लोकप्रतिनिधी लोकसेवा करण्याची ईच्छा मतदारांजवळ व्यक्त करीत आहेत.
गावाचा विकास करण्याचे आश्वासन देऊन घरोघरी हजेरी लावत आहेत. परंतु निवडणुकीनंतर निवडून आलेले बरेच राजकारणी सरड्याप्रमाणे रंग बदलणारे आहेत. याची जाणीव मतदारांना असल्याने पुन्हा अशा उमेदवारांना संधी द्यायची की नाही, हे मतदारांच्या हातात आहे. म्हणून मतदार राजा यावेळी सुशिक्षित व तरूण उमेदवाराला प्राधान्य देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी निवडणुकीत निवडून आलेले आता पुन्हा उभे ठाकले आहेत. या उमेदवारांनी लोकहितासाठी काय केले, असे मतदार विचारू लागले आहेत. आज अनेक उमेदवार पक्षाच्या निवडणूक चिन्हावर उभे आहेत. त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काय काम केले, हे सुद्धा उमेदवारांना मतदाराला सांगावे लागत आहे. शहरात अनेक समस्या आहे, त्या सुटलेल्या नाही. यामध्ये रस्त्याची दयनिय अवस्था, गल्लीची अस्वच्छता, रस्त्यांवर दुकानांचे वाढलेले अतिक्रमण आदी प्रश्नांचा समावेश आहे. नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडून आल्यानंतर पुन्हा पाच वर्ष अनेक प्रतिनिधी मतदारांना तोंडही दाखवित नाही. निवडणुकीच्या या रणधुमाळीत वाम मार्गाने कमाविलेला पैसा वापरून मतदारांची खरेदीही काहीजण करू पाहत आहेत, या सर्व परिस्थितीत मतदार राजा जागरूक होऊन मतदानाचा हक्क बजावणार आहे. भामरागड नगर पंचायतीसाठी ६५ उमेदवार मैदानात असून त्यातून १७ चांगले उमेदवार निवडण्याची संधी यानिमित्ताने मतदारांकडे चालून आली आहे. या संधीचे मतदार राजा सोन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.