वडिलांच्या हातचे पाणी पिऊन 'त्याने' सोडला प्राण; हृदयद्रावक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2022 02:08 PM2022-11-03T14:08:20+5:302022-11-03T14:15:15+5:30

टँकर अपघातात एकुलत्या एक मुलाला गमवावे लागल्याने वाढई कुटुंबावर आघात

young man Injured in septic tanker bullock cart accident dies | वडिलांच्या हातचे पाणी पिऊन 'त्याने' सोडला प्राण; हृदयद्रावक घटना

वडिलांच्या हातचे पाणी पिऊन 'त्याने' सोडला प्राण; हृदयद्रावक घटना

googlenewsNext

कोंढाळा (गडचिरोली) : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे मंगळवारी (दि. १) सायंकाळी झालेला एक अपघात गावातील संपूर्ण नागरिकांवर शोककळा पसरवणारा ठरला. सायंकाळचे ७ वाजले असताना घराचे वेध लागलेल्या वाढई कुटुंबासाठी काळ बनून आलेल्या सेप्टिक टँकरने बैलगाडीला जबर धडक दिली. गावापासून देसाईगंज मार्गावर अवघ्या १०० मीटर अंतरावर झालेल्या या अपघातात वाढई कुटुंबातील एकुलत्या एक आणि तरुण मुलाला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर वडिलांनी मुलाला पाजलेले पाणी त्याच्यासाठी शेवटचे ठरले. रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली.

कोंढाळा येथील माणिक वाढई (५५ वर्षे) आणि त्यांचा मुलगा रोशन ऊर्फ श्रीकृष्ण माणिक वाढई (२० वर्षे) या बापलेकावर ओढवलेल्या या प्रसंगाने गावकऱ्यांना हेलावून सोडले. आई-वडिलांना एकुलता एक असलेला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून सर्वांचे काळीज हेलावले. जखमी अवस्थेत वडिलांनी मुलाला वाचविण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न आणि मदतीसाठी दिलेली आर्त हाक पाहून सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यामुळेच रागाच्या भरात गावकऱ्यांनी टँकर पेटवून दिला.

वाढई पिता-पुत्र शेतातील कामे आटोपून आपल्या बैलबंडीने गावाकडे येण्यासाठी निघाले होते. अशातच रोशन याने वडिलांना रस्त्यातच म्हटले, ‘बाबा आपण १५ मिनिटांतच घरी पोहोचू.’ वडिलांनी त्याला दुजोरा देत ते स्वतः बैलबंडी हाकत होते, तर रोशन मागे बसून बंडीला बांधलेली म्हैस बघत होता. अवघ्या ५ मिनिटांत ते घरी पोहोचणार होते. पण, सायंकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव वेगाने मागून आलेल्या सेप्टिक टँक क्लीनर (गटार सफाई मशीन) वाहनाने त्यांच्या बैलबंडीला जबर धडक दिली.

अपघाताची बातमी गावामध्ये पसरताच गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. काही वेळातच देसाईगंज पोलिसांना पाचारण करण्यात आले. अपघात घडलेल्या मुलाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; पण त्याला मृत घोषित करण्यात आले. संतप्त जमावाने गटार सफाई वाहनाला आग लावली. पोलिसांनी नंतर परिस्थिती नियंत्रणात आणली.

अन् रोशन चेंडूसारखा उडून रस्त्यावर कोसळला

टँकरची धडक एवढी जबर होती की या धडकेमुळे एका बैलाचे एक शिंग तुटून पडले. रोशन वाढई बंडीवरून उसळून डांबरी रस्त्यावर जाऊन पडला. माणिक वाढई बंडीच्या कडेला कोसळले. मागे बांधलेली म्हैस अपघातानंतर कुठे पळाली याचा थांगपत्ताच लागला नाही. अपघातानंतर गटार सफाई मशीनच्या वाहनातील वाहक, चालक पसार झाले होते.

चालकाला बुधवारी अटक

धडक देणाऱ्या सेप्टिक टँकरच्या पसार झालेल्या चालकाला पोलिसांनी हुडकून काढत अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रोशन वाढई याच्यावर बुधवारी अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक कोंढाळा गावात उपस्थित होते. वैनगंगा नदीकाठावर अंतिम संस्कार करण्यात आले.

Web Title: young man Injured in septic tanker bullock cart accident dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.