तरुणाने केली प्रेयसीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 05:00 AM2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:00:37+5:30
विहीरीत पडलेल्या प्राचीच्या कमरेला सिमेंटच्या पोत्यांमध्ये भरून दगड बांधले होते. त्यावरून वडिलांनी तिची हत्या करून विहिरीत फेकल्याचा आरोप केला. परंतू पोलिसांनी तिला धक्का देऊन विहीरीत ढकलले असे सांगितले. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात रात्री आणल्यानंतर शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : ज्याच्या जीवात जीव अडकला, प्रेमाच्या आणाभाका घेऊन ज्याच्यावर विश्वास टाकला त्या प्रियकरानेच आपल्या प्रेयसीला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना एटापल्लीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या बोलेपल्ली पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पिलीगुडम गावालगत घडली. जयदेव निरंजन सरदार (२२) असे आरोपीचे नाव असून तो फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटापल्ली पोलीस उपविभागांतर्गत पिलीगुडमपासून २५ किमी अंतरावर असलेल्या कोपरअल्ली (ता.मुलचेरा) या गावातील जयदेव निरंजन सरदार (२२) आणि पवन दयाल जुलमे (२२) या दोन युवकांचे पिलीगुडम येथील प्राची बारसागडे (१८) आणि छकुली (१९) या दोन युवतींसोबत प्रेमसंबंध होते. त्या चौघांमध्ये खास मैत्री होती. गुरूवारी (दि.११) सकाळी दोघीही मैत्रिणी आई-वडील घरी नसताना घरून निघून गेल्या. सायंकाळी आई-वडील घरी आल्यानंतर त्यांनी मुलींचा शोध घेतला पण मुली मिळाल्या नाही.
प्राचीच्या वडीलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्र ार बोलेपल्ली पोलीस मदत केंद्रात शुक्र वारी सकाळी दिली. त्याचवेळी तिचा प्रियकर असलेल्या युवकावर शंकाही घेतली. पोलिसांच्या सूचनेनुसार प्राचीच्या आई-वडीलांनी दोन्ही युवकांच्या कोपरअल्ली गावात जाऊन चौकशी केली असता प्राचीची मैत्रिण छकुली आणि तिचा प्रियकर पवन गावातच होते. परंतु जयदेव गावात नव्हता. गावकऱ्यांनी त्यांच्यावर दबाव टाकून विचारले असता प्राची ही पिलीगुडम गावापासून १ किमी अंतरावरील शेतातल्या विहीरीत पडून असल्याची माहिती त्यांनी दिली. गावकऱ्यांनी परत येऊन बोलेपल्ली पोलीस मदत केंद्राला दिली. पोलिसांच्या सूचनेनुसार गावकरी व प्राचीच्या वडीलांनी विहिरीतील तिचा मृतदेह बाहेर काढला.
विहीरीत पडलेल्या प्राचीच्या कमरेला सिमेंटच्या पोत्यांमध्ये भरून दगड बांधले होते. त्यावरून वडिलांनी तिची हत्या करून विहिरीत फेकल्याचा आरोप केला. परंतू पोलिसांनी तिला धक्का देऊन विहीरीत ढकलले असे सांगितले. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात रात्री आणल्यानंतर शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले.
हत्येनंतर मैत्रिणीने मंदिरात केला विवाह
प्राचीला विहीरीत ढकलल्यानंतर तिची मैत्रिण छकुली आणि तिचा प्रियकर पवन जुलमे यांनी बोलेपल्लीजवळील एका शिवमंदिरात आरोपी जयदेवच्या उपस्थितीत विवाह केला, अशी कबुली पोलीस मदत केंद्रात दिली. त्यामुळे या घटनेचे गूढ आणखी वाढले असून प्राचीची हत्या तिच्या प्रियकराने नेमक्या कोणत्या कारणातून केली हे प्रियकराच्या शोधानंतरच उघडकीस येणार आहे. दरम्यान या घटनेशी संबंधित छकुली व पवन यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याच बयानावरून प्राचीचा प्रियकर जयदेव याच्यावर भादंवि कलम ३०२ चा गुन्हा दाखल केला, मात्र तो फरार आहे.
घटनेच्या वेळी प्राची आणि जयदेव यांच्यात भांडण झाले असावे. या भांडणातून जयदेवने प्राचीला विहिरीत धक्का देऊन पाडले अशी शक्यता आहे. हत्येचा गुन्हा दाखल झाला असून जयदेवचा शोध सुरू आहे. छकुली व पवनला बोलावून त्यांचीही चौकशी सुरू आहे.
- एस.एस.चव्हाण,
ठाणेदार, पोलीस मदत केंद्र, बोलेपल्ली